महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे रविवारी उशिरा रात्री मेळघाटात आगमन झाले. सकाळी त्यांनी दुर्गम भागातील हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले व त्या ठिकाणच्या आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेतली.
या ठिकाणच्या पाण्याची व विजेची समस्या तसेच बंद असलेला सौर ऊर्जा प्रकल्प व इतर समस्यांविषयी मंत्र्यांनी बरीच नाराजी व्यक्त केली. या ठिकाणच्या आदिवासी बांधवांशी थेट चर्चा करून आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून समस्या जाणून घेतल्या, तसेच पाण्याची समस्या तात्काळ सोडवावी तसेच विजेची समस्या सुद्धा सोडवावी असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान, आरोग्यमंत्र्यांना या ठिकाणी बर्याचशा त्रुटी आढळल्या. त्या तात्काळ पूर्ण कराव्यात, उमेद गटातील आदिवासी बांधवांना उत्कृष्ट अशा आरोग्य सुविधा पुरवाव्यात असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी हतरू ग्रामपंचायतच्या सरपंच सुमित्रा बेठेकर, उपसरपंच भैय्यालाल मावसकर उपस्थित होते. यासह आरोग्यमंत्र्यांनी हिल्डा, खारी, बिबा, बारुगव्हाण, जारिदा, चुरणी, काटकुंभ इत्यादी गावांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या आरोग्य समस्या जाणून घेतल्या व त्या ठिकाणच्या आदिवासी बांधवांची थेट संवाद साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यासोबत मेळघाटचे आमदार केवलराम काळे, चिखलदराचे तहसीलदार जीवन मोरणकर, पंचायत समितीचे बीडीओ शिवशंकर भारसाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रवीण पारिसे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
असुविधा पाहून मंत्री संतापले
हतरु प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधा पाहून आरोग्य मंत्री चांगले संतापले. हिल्डा, बारूगव्हाण, यासह चुरणी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी करताना अनेक कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहत नाही असे उपस्थित नागरिकांनी सांगताच त्या ठिकाणी अधिकार्यांची सुद्धा कानउघाडणी मंत्र्यांनी केली. अनेक अधिकार्यांवर कारवाईची टांगती तलवार असून ते धास्तावले आहेत.समस्या सोडविण्याकरिता प्रयत्नशील महाराष्ट्र राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. मेळघाटात कुपोषण, मातामृत्यू, बालमृत्यू मोठ्या प्रमाणात आहे. या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने मेळघाटला भेट दिली आहे. त्या सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोलताना सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.