राज्यात सध्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन देखील करत आहेत. दरम्यान औरंगजेबाच्या कबरीवरून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगजेबाचं महिमामंडण कधीच होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिला आहे. तर औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण
असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. केंद्राने संरक्षण दिल्यामुळे
महाराष्ट्रालाही संरक्षण देणं भाग असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद
केलंय.
सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस म्हणाले की, खरं म्हणजे, त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रात कशाला
हवी? परंतु आपल्याला देखील कल्पना आहे. एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी
संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलंय. त्यामुळे त्याचं संरक्षण करण्याची
जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर येवून पडलेली आहे. काय दुर्दैव
आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं. त्याच्या कबरीचं संरक्षण
आम्हाला करावं लागतंय, असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
परंतु यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक शब्द दिलाय. फडणवीस म्हणाले की, काहीही झाले तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होवू देणार नाही. त्याचं उदात्तीकरण होवू देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिराच्या समोर मी आपल्या सर्वांना देतो, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय.क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबची कबर महाराष्ट्रातून कायमची नेस्तनाबूत करावी, ती कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्ते आंदोलन करत आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाचे कार्यकर्ते औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शासनाने या कबरीला अजून संरक्षण पुरवल्याचं समोर आलंय. राज्यात मोठा गदारोळ या कबरीवरून सुरू आहे, अशातच आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.