Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशाच्या खासदारांवर भारी पडले महाराष्ट्रातील आमदार... दीड पट पगार अन् दुपट्ट भत्ते घेत ठरले 'किंग'

देशाच्या खासदारांवर भारी पडले महाराष्ट्रातील आमदार... दीड पट पगार अन् दुपट्ट भत्ते घेत ठरले 'किंग'
 

राज्यघटनेच्या 106 कलमानुसार संसद सदस्यांना वेतन आणि भत्ते घेण्याचा अधिकार आहे. याच हक्कानुसार, देशातील खासदारांची काल (25 मार्च) रोजी तब्बल 24 टक्के इतकी घसघशीत पगारवाढ झाली. पगाराबरोबरच त्यांचे भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ झाली आहे. पण एवढी वाढ होऊनही महाराष्ट्रातील आमदारांपेक्षाही ती नगण्य म्हणावी अशीच आहे. त्यामुळे देशाच्या खासदारांवर महाराष्ट्राचे आमदार भारी ठरल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रातील आमदारांना किती मिळते वेतन?

लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाच्या पाच ते सहापट आणि काही राज्यांमध्ये आठ ते दहापट असतो. महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाच्या एक षष्ठांश आहे. पण खासदारांपेक्षा महाराष्ट्रातील आमदारांना मिळणारे वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन अधिक आहे. आमदारांचे मूळ वेतनच 1 लाख 82 हजार 200 रुपये आहे. याशिवाय टेलिफोन भत्ता 8 हजार, स्टेशनरी भत्ता 10 हजार आणि संगणक भत्ता 10 हजार असे मिळून एका आमदाराला प्रति महिना साधारण 2 लाख 41 हजार 174 रुपये फिक्स पगार मिळतो. याशिवाय प्रतिबैठक 2 हजार रुपये भत्ताही मिळतो. म्हणजे अधिवेशनावेळी सभागृहाबाहेरील हजेरी पत्रकात सही केल्यानंतर हा भत्ता मिळतो. आमदारांच्या स्वीय सहाय्यकासाठी 25 हजार रुपये पगार राज्य सरकार देते.

आमदारांना दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा :
या भत्त्यांव्यतिरिक्त मुंबईत मोफत निवासस्थान मिळते. निवास स्थान उपलब्ध नसल्यास निवास भत्ता मिळतो. स्वतःला आणि कुटुंबाला राज्यात 32 वेळा आणि राज्याबाहेर 8 वेळा मोफत विमानप्रवास मोफत मिळतो. याशिवाय राज्यांतर्गत प्रवासासाठी दर वर्षाला 15 हजार आणि महाराष्ट्राबाहेरील प्रवासासाठी जायचे असल्यास स्वतंत्र 15 हजार रुपये मिळतात. देशभरात संपूर्ण प्रवास टोल फ्री असतो. सोबतच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळते. रेल्वे प्रवासही मोफत मिळतो.

संसदेत खासदारांचे निवृत्तिवेतन 25 हजारांवरून 31 हजार रुपये वाढले आहे. पण हेच महाराष्ट्रात आमदारांसाठी मूळ निवृत्तिवेतन 50 हजार रुपये आहे. त्यानंतर प्रतिटर्म दोन हजार रुपयांची वाढ होते. निधन झाल्यास पती किंवा पत्नीला 40 हजार रुपये निवृत्तिवेतन मिळते. आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सर्व वैद्यकीय सुविधा मोफत मिळतात. देशात एखाद्या आजारावर उपचार शक्य नसेल, तर सरकारच्या परवानगीने परदेशातील उपचारांचा खर्च मिळतो. माजी आमदार आणि त्यांच्या पती/पत्नींनाही मोफत उपचार सुविधा मिळतात.
खासदार निधीच्या बरोबरीने आमदार निधी :

सर्वात महत्वाचे म्हणजे खासदारांच्या बरोबरीनेच आमदारांनाही वार्षिक पाच कोटी रुपयांचा खासदार निधी मिळतो. त्यामुळे खासदारांच्या तुलनेत एका छोट्या मतदारसंघात पाच कोटी रुपये खर्च करायला मिळतात. अशा अनेक सवलतींमुळे कार्यक्षेत्र लहान पण कीर्ति महान अशी परिस्थिती आमदारांची आहे. त्यामुळे विधानसभेवर निवडून गेलेले आमदार लोकसभेच्या खासदारांपेक्षा वरचढ आणि लोकप्रिय ठरतात.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.