गुजरातमधील सूरत येथे एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने पाणी समजून चुकून ॲसिड प्राशन केल्याची घटना घडली आहे. ही बाब लक्षात येताच ते किंचाळू लागले. त्यांची तब्येत बिघडली. त्यांचा आरडाओरडा ऐकून त्यांची पत्नी धावत आली. तेव्हा पत्नीने डोक्याला
हात लावला. कारण तिनेच तिथे ॲसिडची बाटली ठेवली होती आणि पाणी असल्याचे
समजून डॉक्टर पतीने ते प्राशन केले होते. पत्नीने लगचेच डॉक्टर मित्राला
फोनकरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर पतीला तातडीने दवाखान्यात
दाखल करण्यात आले.
तिथे त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर काही प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनीही दवाखान्यात धाव घेत डॉक्टरांचा जबाब नोंदवून घेतला. कारण या पाठीमागे काही घातपात तर नाही ना याची याचा संशय पोलिसांना होता. पण हा घातपात किंवा कोणतेही गुन्हेगारी षडयंत्र नसून अपघात असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
16 मार्चला घडली होती घटना
ही घटना 16 मार्च रोजी घडली असली तरी, याबाबतची माहिती सोमवारी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील स्मिमेर सरकारी रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागात हे डॉक्टर कार्यरत आहेत. राजेश पटेल असे त्यांचे नाव आहे. त्यांनी चुकून ॲसिड प्राशन केले.
त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे.
पत्नीने चुकून टेबलवर ठेवली होती बाटली
कॅनाल रोडवरील कोरल हाईट्स येथे राहणारे डॉक्टर राजेश पटेल घरी असतानाच हा प्रकार घडला होता. त्यांची पत्नी घराची स्वच्छता करत होती. तेव्हा चुकून त्यांनी ॲसिडची बाटली टेबलवर ठेवली होती. ती टेबलवर तशीच राहिली होती. रात्री एक वाजता डॉक्टर राजेश पटेल यांनी पाण्याची बाटली समजून ती तोंडाला लावले आणि त्यातील ॲसिड प्राशन केले. ॲसिड गिळताच त्यांची तब्येत झपाट्याने बिघडू लागली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.