सांगली:- सरकारने निवडणुकीत शेतकर्यांचा सात-बारा कोरा करू, असे आश्वासन देऊन केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवली. त्यामुळे आता निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळावे, शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, 'मार्च अखेर'च्या निमित्ताने शेतकर्यांवर सक्तीने वसुलीची कारवाई केली जात आहे, ती तत्काळ थांबवावी, अन्यथा पूर्वीप्रमाणे संस्था पेटवू, बँकांना टाळे ठोकू, असा इशारा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, कर्जमाफीच्या मागणीसाठी पहिल्या टप्प्यात 2 एप्रिलला शेतकरी संघटनेच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चासाठी शेतकर्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन रघुनाथदादा यांनी केले. ते म्हणाले, शेतकरी संघटनेच्या वतीने 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपासून 19 मार्च 2025 पर्यंत महाराष्ट्रातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणाचे पहिले बळी ठरलेले साहेबराव करपे यांच्या स्मृती दिवसापर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती जनजागरण अभियानाचा महाराष्ट्रभर प्रचार झाला.सरकारने विधानसभेत शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासंदर्भात अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून कर्जमुक्तीसाठी पावले उचलली आहेत. हे शेतकरी संघटनेने केलेल्या एक दिवसीय आंदोलनाचे फलित आहे. एकीकडे समिती स्थापन केलेली असताना शेतकर्यांवर कर्जवसुलीसाठी जप्तीची कारवाई केली जात आहे, ती तत्काळ थांबवा, अन्यथा पूर्वीप्रमाणे आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संस्था पेटवून देऊ, बँकांना टाळे ठोकू . त्याशिवाय साखर कारखान्यांची अंतर अट रद्द करावी. सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.