Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्र्यांची अनास्था, अधिकारी विचारेनात, पतच घसरली; विधानसभेत सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

मंत्र्यांची अनास्था, अधिकारी विचारेनात, पतच घसरली; विधानसभेत सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी व्यक्त केली तीव्र चिंता
 

मुंबई : विधानसभेत मंत्री हजर नाहीत म्हणून प्रश्न पुढे ढकलावे लागतात, लक्षवेधी सूचना मागे-पुढे कराव्या लागतात. मंत्र्यांची अशी अनास्था, तर आहेच, पण संबंधित खात्याचे अधिकारी हे अदृश्य गॅलरीत बसून पूर्वी मुद्दे लिहून घेत असत, तेही हल्ली होत नाही, अशी खंत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी सभागृहात व्यक्त केली.

त्यावर, मुख्य सचिवांना सरकारने आदेश द्यावेत, असे निर्देश तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिले. अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही. मंत्री सभागृहात बसत नाहीत. विधान परिषदेत कामकाज आहे, असे सांगून निघून जातात. पूर्वी गृह खात्यावर चर्चा सभागृहात व्हायची तेव्हा लॉबीमध्ये पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांपासून बडे अधिकारी बसून मुद्दे लिहून घेत असत. पूर्वीसारखे आज तेथे सचिव वा त्यावरील दर्जाचे अधिकारी न बसता मंत्र्यांचे पीए, पीएस बसलेले असतात. सभागृहात मंत्री नाहीत, गॅलरीत अधिकारी नाहीत असेच चालले तर मग सभागृहातील सदस्यांच्या भावना सरकारच्या कानावर कशा जाणार, अशी चर्चा तर वांझोटीच ठरेल, असा हल्लाबोल जाधव यांनी केला. एखादी दुर्घटना घडली की, मंत्री पोहोचतात, पण सचिव कधीही जात नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुख्य सचिवांना आपबिती सांगा
 
सभागृहात मंत्री नसल्याने, अधिकारी दिसत नसल्याने आम्ही कसे हतबल आहोत, हे सर्वपक्षीय सदस्य पोटतिडकीने मांडत होते. सर्वांचा जास्त रोख होता तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच. त्याची दखल घेत तालिका अध्यक्षांनी याबाबत सरकारने मुख्य सचिवांनी योग्य ते आदेश द्यावेत, असे निर्देश दिले.

मंत्री झटकतात जबाबदारी
शरद पवार गटाचे ज्येष्ठ सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली की, ज्यांच्या खात्यावर चर्चा सुरू आहे, ते मंत्री सभागृहात हजर नसतात. वेगळेच मंत्री मुद्दे लिहून घेत असल्याचे सांगतात. सरकारची ही सामूहिक जबाबदारी असल्याचे कारण देत मूळ मंत्री जबाबदारी झटकतात, हा या सर्वोच्च सभागृहाचा अपमान आहे.
भाजपचे सुरेश धस म्हणाले, सहा वर्षे विधान परिषदेचा सदस्य होतो. तेव्हा विधान परिषदेची पत ठेवली जात नाही, अशी खंत व्यक्त करायचो, आता विधानसभेत आहे तर इथेही तीच स्थिती आहे, हे थांबले पाहिजे. ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनीही नाराजी बोलून दाखविली. ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सदस्यांच्या भावना लक्षात घेत मंत्री वरच्या सभागृहात असले तरी संबंधित सचिवांनी गॅलरीत बसून नोंदी घेतल्या पाहिजेत आणि तसे निर्देश अध्यक्षांनी द्यावेत, अशी विनंती केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.