संतोष देशमुखांवर झालेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे खळबळ उडवून देणारे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना बीड हत्याकांडाचे फोटो समोर आल्यानंतर वातावरण आणखीनच तापलं आहे. यावरुनच विरोधकांकडून सरकावर टीका केली जात आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांनी जनभावना लक्षात घेऊन कारवाई करावी अशी मागणी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. हत्येशी संबंधित सर्वांवर कारवाई केली जावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. त्यानंतर आता संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. व्हायरल झालेले फोटो पाहून देशमुख कुटुंबियांसह संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे म्हटलं.
"वृत्तवाहिन्यांनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे फोटो प्रसारीत केले आहेत. हे फोटो पाहताना कोणत्याही संवेदनशील माणसाचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. हे फोटो पाहताना किती क्रूरपणे ही हत्या झाली असावी याचा अंदाज येतो. ही घटना आणि त्यातील क्रौर्य प्रचंड अस्वस्थ करणारे आणि माणूसकीला काळीमा फासणारे आहे. याप्रकरणी ज्या शक्तींचा वारंवार उल्लेख होत आहे त्या शक्तींवर कारवाई झालीच पाहिजे. उभा महाराष्ट्र आज देशमुख कुटुंबीयांच्या न्याय्य मागणीच्या मागे ठामपणे उभा आहे. स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जनभावना लक्षात घेऊन जनतेला आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांना माझी नम्र विनंती आहे की कृपया आपण या घटनेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्या सुत्रधारांवर कारवाई करावी," असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.