एखादी व्यक्ती आपल्याला आवडत असेल तर त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी तरुणांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. कोणी तरुणीच्या आवडत्या वस्तू आणतो, कोणी तिला आवडणाऱ्या गोष्टी करतो. कसंही करून त्या तरुणीचं लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असतो. मात्र कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील एका प्रेमवीराने तरुणींनी आकर्षित करण्यासाठी अघोरी कृत्याचा आधार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे दृश्य पाहून गावकऱ्यांनाही धक्का बसला. आकुर्डे-महालवाडी दरम्यान असलेल्या एका शेतात हा अघोरी प्रकार दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांकडून हे अघोरी कृत्य करण्यात आलं आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातील हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात बाभळीच्या झाडाला दाभणाने मुलींचे फोटो लटकवण्यात आले आहेत. याशिवाय तरुणींच्या ड्रेसची बटणंही या दाभणात लावण्यात आली आहे. यामध्ये लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचाही वापरही करण्यात आला आहे. या झाडावर एका तरुणीसह तिची आई, वडील आणि आजीचे फोटो लटकवल्याचं दिसून आलं. भुदरगड तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. आकुर्डे-महालवाडी दरम्यानच्या कुराण नावाच्या शेतातील गवताच्या माळावर हा अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. हा प्रकार कोणी केला त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.