सांगली : काळू-बाळूच्या बतावणीची भुरळ अजूनही कायम आहे. मुंबई विद्यापीठालाही याची भुरळ पडली आणि सादर झाली तमाशासम्राट काळू-बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देणारी रंगबाजी.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे तमाशा क्षेत्रातील जुन्या पिढीतील विनोदसम्राट काळू-बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी 'रंगबाजी' हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत आयोजित केला होता. लोककला अकादमी आणि लोकजीवन फाऊंडेशन यांनी नियोजन केले. लोककला विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, सहायक प्रा. डॉ. शिवाजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
विनोदसम्राट काळू-बाळू यांची विनोदाची शैली निरागस होती. त्यांची वाणी शुद्ध होती. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचा विनोद अजिबात अश्लील नव्हता, असे मत लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी यावेळी व्यक्त केले. अभिनेते, दिग्दर्शक संतोष पवार यांनी समकालीन रंगभूमीला खरी ऊर्जा काळू-बाळू यांच्यासारख्या लोककलावंतांमुळे प्राप्त झाली, अशा भावना व्यक्त केल्या. प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी, लोककला अकादमीत आम्ही काळू-बाळू यांची रंगबाजी पदवीधर विद्यार्थ्यांना शिकवितो, असे मोठ्या अभिमानाने सांगितले. कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत, काळू-बाळू यांचे नातू आनंद खाडे, राज्यपालांचे निवृत्त उपसचिव देवेंद्र खाडे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक योगेश सोमण, माजी आमदार बाबुराव माने, दिग्दर्शक महेंद्र देवळेकर, शाहीर आप्पासाहेब उगले आदी उपस्थित होते.
नातवांची पिढी...
यावेळी काळू-बाळू यांचे नातू सूरजकुमार व नीलेशकुमार यांनी 'जहरी प्याला' या वगनाट्यातील काळू-बाळू यांनी साकारलेल्या हवालदारांची भूमिका करून रंगत आणली. नातू अनुपकुमार यांनी प्रधानाची भूमिका केली. यावेळी काळू-बाळू यांचे वारस विजयकुमार खाडे यांनीही गण आणि भैरवी सादर करून आठवणीला उजाळा दिला. लोककला अकादमीचे सहायक प्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी काळू-बाळू यांनी लोकप्रिय केलेला मित्राचा कटाव सादर केला.
स्मारक नाही, याची खंत
संपूर्ण महाराष्ट्राला हसविणार्या तमाशासम्राट काळू-बाळू यांचे स्मारक नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. नव्या पिढीला काळू-बाळू कवलापूरकर यांची ओळख व्हावी, यासाठी लवकरात लवकर उचित स्मारक होणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्यानावे शासनाने विनोदी क्षेत्रातील कलावंतांसाठी विशेष पुरस्कार सुरू करणे गरजेचे आहे, असे मत लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.