Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'क्यूआर कोड'द्वारे पडताळणीला डॉक्टरांचा विरोध

'क्यूआर कोड'द्वारे पडताळणीला डॉक्टरांचा विरोध
 

मुंबई : बोगस डॉक्टरांद्वारे होणारी रुग्णांची फसवणूक टळावी यासाठी महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेने (एमएमसी) सर्व डॉक्टरांना दवाखान्याबाहेर जलद प्रतिसाद संकेत प्रणाली (क्यूआर कोड) लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र 'क्यूआर कोड'ची खरोखर गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित करत अनेक डॉक्टरांनी संताप व्यक्त केला.

एमएमसीच्या संकेतस्थळावर नोंदणी करून ३४१ रुपये शुल्क भरल्यानंतर डॉक्टरांना 'क्यूआर कोड' देण्यात येत आहे. यात डॉक्टरांचे नाव, नोंदणी केल्याची तारीख, शैक्षणिक माहिती असेल. नोंदणीकृत सर्व डॉक्टरांनी क्यूआर कोड घ्यावा यासाठी 'एमएमसी'ने नुकतेच १ लाख ४० हजारांहून अधिक डॉक्टरांना पत्र पाठवले. हा कोड डॉक्टरांना दवाखान्याबाहेर लावावा लागणार आहे. यामुळे रुग्णाला डॉक्टरची सविस्तर माहिती उपलब्ध होणार असल्याचे 'एमएमसी'कडून सांगण्यात येत आहे. सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने ही अधिसूचना मागे घ्यावी, अशी मागणी 'हीलिंग हँड्स युनिटी पॅनल'चे उमेदवार डॉ. तुषार जगताप यांनी 'एमएमसी'चे निबंधक डॉ. राकेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. निविदा प्रक्रिया राबवली का? नोंदणीकृत वैद्याकीय व्यावसायिकांनी स्वत:च्या प्रमाणीकरणासाठी इतके पैसे का द्यावेत, असे सवाल डॉ. जगताप यांनी केले आहेत. नर्सिंग होमसाठी डॉक्टरांना जवळपास २६ ते ३० विविध प्रकारच्या परवानग्या लागतात. 'क्यूआर कोड'मुळे डॉक्टरांच्या गोपनीय माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता मुंबई प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग सोसायटीच्या (मॉग्स) पदाधिकाऱ्याने बोलून दाखविली. 'नो युवर डॉक्टर' उपक्रमांतर्गत दवाखान्याबाहेर 'क्यूआर कोड' लावण्याची सूचना एमसीएने केली असली तरी याविरोधात नाराजी आहे.
हा निर्णय म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' असा प्रकार आहे. डॉक्टर दवाखान्यामध्ये सर्व पदव्या, मिळालेले पुरस्कार लावतात. यावरून डॉक्टरांच्या पात्रतेची कल्पना येते. मग क्यूआर कोडचा घाट कशासाठी?

डॉ. तुषार जगताप, 'हीलिंग हँड्स युनिटी पॅनल'
राज्यातील जवळपास ९० हजार डॉक्टरांनी आतापर्यंत नोंदणीचे नूतनीकरण केले आहे. 'क्यूआर कोड'मुळे कोणतीही गोपनीय माहिती उघडकीस येणार नाही. केवळ बोगस डॉक्टरच क्यू आर कोडला घाबरतील.

डॉ. विंकी रुघवाणी, प्रशासक, 'एमएमसी'

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.