'माझे हातपाय तोडा, पण...', जीव जाण्याआधी संतोष देशमुखांची मारेकऱ्यांकडे विनवणी, मुलीची भावनिक प्रतिक्रिया
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिस तपासातून विविध खुलासे केले जातायत. अलीकडेच सोशल मीडियावर संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभर संताप उफाळून आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडशी संबंध असल्याच्या कारणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडेंना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे.
एकीकडे या सर्व घडामोडी सुरू असताना आता संतोष देशमुख यांनी हत्येआधी केलेल्या विनवणीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. हत्येआधी संतोष देशमुख मारेकऱ्यांकडे काय विनवणी करत होते, याबाबत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख हिने महत्त्वाचं विधान केलं आहे. माझ्या वडिलांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली. पण या लोकांना खंडणी मागायला कुणी पाठवलं? त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त होता. याची चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावं, अशी मागणी वैभवीनं केली आहे.
दरम्यान, त्यांनी हत्येच्या आधी संतोष देशमुख यांनी मारेकऱ्यांकडे काय विनवणी केली होती? याबाबतचा खुलासा वैभवी देशमुखनं केला आहे. माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते माझे हातपाय तोडा, पण गाव आणि मुलांसाठी मला जगू द्या, अशी विनवणी करत होते. पण त्यांनी कसलीही दयामया दाखवली नाही. ते निर्दयीपणे मारहाण करत राहिले, अशी भावनिक प्रतिक्रिया वैभवीनं दिली आहे.
बीडमध्ये ९ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन घुलेसह त्याच्या काही साथीदारांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं होतं. यानंतर आरोपींनी अमानुषपणे मारहाण करत संतोष देशमुखांचा जीव घेतला होता. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये नराधम आरोपी निर्दयीपणे देशमुखांना मारहाण करताना दिसत आहेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नैतिकेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.