पुणे हादरलं! आयटी अभियंत्याने आपल्याच साडेतीन वर्षाच्या मुलाला का संपवलं, संपूर्ण घटनाक्रम वाचा
पुण्यातील चंदननगरमध्ये घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. पत्नीवर संशय घेत एका आयटी अभियंत्याने आपल्या निष्पाप तीन वर्षांच्या मुलाचा निघृण खून केला. हिम्मत माधव टिकेटी (वय ३.५ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. हा संतापजनक प्रकार शुक्रवारी (२१ मार्च) नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी, विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी उघडकीस आला.
माधव साधुरात टिकेटी (वय ३८, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे आरोपी पित्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टणमचा असून, २०१६ पासून पुण्यात स्थायिक आहे. या घटनेची तक्रार मृत मुलाची आई स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात दिली.
मुलाला घेऊन बाहेर गेला पण परतला नाही
स्वरूपा माधव टिकेटी या गृहिणी असून, त्यांचा पती माधव एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी (२० मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास माधवने पत्नीला सांगितले की, तो मुलगी शाळेतून आणतो आणि त्याच्यासोबत तीन वर्षांचा मुलगाही असेल. मात्र, मुलीला न आणता तो थेट बाहेर निघून गेला.पोलिसांनी केली चौकशी, आरोपीचे खोटे उघड
यावेळी स्वरूपाने माधवला फोन केला असता, त्याने "मी हिम्मतला घेऊन बाहेर सिगारेट पिण्यासाठी आलो आहे" असे सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही आणि त्याचा फोनही बंद आला. स्वरूपाने नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे चौकशी केली, मात्र दोघांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर, तिने २१ तारखेला रात्री उशिरा चंदनगर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तक्रार दाखल होताच त्वरित तपासाला सुरुवात केली. माधवला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सांगितले की, "दारू पिल्यानंतर हडपसर बस स्थानकावर असताना मुलगा हरवला." मात्र, पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे आणि विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला कसून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हत्या पत्नीच्या चारित्र्यावर संशयातूनच !
चौकशीत माधवने खरा गुन्हा कबूल केला. पत्नीवर तो अनेक दिवसांपासून संशय घेत होता. त्या संशयातूनच त्याने आपल्या निष्पाप मुलाचा खून करण्याचा अमानुष निर्णय घेतला. माधवने सांगितले की, तो मुलाला घेऊन निर्जनस्थळी गेला आणि चाकूने त्याचा गळा चिरून निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर मृतदेह एका निर्जन भागात टाकून घरी न परतता तो शहरात फिरत राहिला.
शहरात संतापाची लाट, आईची अवस्था दयनीय
स्वरूपा टिकेटी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधव टिकेटी याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत अटक करण्यात आली असून, लवकरच न्यायालयात हजर केले जाणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.