लोणी काळभोर: अनेकदा सबळ पुराव्याअभावी गुन्हेगार सहिसलामत सुटत असतात, पण पुणे शहरात अशा एक तडफदार महिला पोलीस हवालदार आहेत कि ज्यांनी साक्षीदार व न्यायालय यांच्यातील योग्य दुवा साधला आहे. त्यामुळेच की काय न्यायालयात साक्षीदारांसह भक्कम पुरावे वेळोवेळी सादर करून एक दोन नव्हे, तर 23 गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम आपल्या कार्यकाळात केलं आहे. गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्यातील या तडफदार महिला पोलीस हवालदार आहेत ललिता सिताराम कानवडे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेले लिंगदेव हे त्यांचे गाव. शेतकरी वडिल असलेले सिताराम कानवडे व आई मीराबाई यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना चार बहिणी व एक भाऊ आहे. प्राथमिक शिक्षण गावातीलच लिंगेश्वर आदर्श विद्यालयात झाले. पुढे त्यांनी संगमनेर येथे कमवा व शिकवा पद्धतीने पदवीचे शिक्षण मोठ्या कष्टाने पूर्ण केले. दरम्यान सन 2006 ला पदवीच्या तृतीय वर्षाला असतानाच महाविद्यालयात तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचे एक व्याख्यान झाले ललिता प्रेरित झाल्या. तो क्षणच त्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला कारण आपणही पोलीस व्हावे असे त्यांनी स्वप्न पाहिले. केवळ स्वप्न पाहून त्या शांत बसल्या नाहीत, तर त्यांनी पोलिस होण्याचा ध्यासच घेऊन त्या दिशेने अभ्यास आणि सराव करायलाही सुरूवात केली.
ध्येयाला कष्ट, मेहनत आणि चिकाटीची जोड दिली की यश मिळतेच. ललिता यांचेही तसेच झाले. त्यांच्या कष्टाच्या रोपट्याला वर्षभरातच मेहनतीचे गोड फळ लागले आणि त्याच वर्षी पोलीस भरतीची परीक्षा देऊन अगदी पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. आणि आज हवालदार ललिता या गावातील पहिल्या महिला पोलिस आहेत, याचा गावाला खूप अभिमान वाटतो.
प्रशिक्षणानंतर ललिता 2008 साली पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी घराची जबाबदारी सांभाळून बहिण भावांना उच्च शिक्षण दिले. या दरम्यान, ललिता यांनी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय, तंटामुक्ती अभियान, सीबीआय व वडगाव मावळ पोलीस ठाण्यात काम केले. दरम्यान 2010 साली त्यांचा संजय गडाख यांच्याही विवाह झाला. आज त्या दोन मुलींच्या आई आहेत. विशेष बाब म्हणजे ललिता यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांची लहान बहिण सुनीता कानवडे या सुद्धा पोलीस दलात कार्यरत झाल्या आहेत.सेवा बजावत असताना लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ललिता कानवडे सन 2021 साली रुजू झाल्या. त्यांच्याकडे पोलीस ठाण्यातील महत्वाचा विभाग आला. तो म्हणजे कोर्ट पैरवी किंवा समन्वय होय. त्यांनी या चार वर्षाच्या कालावधीत साक्षीदारांना न्यायालयात हजर होण्यासाठी समन्स बजावले. मोठ्या जिकिरीने साक्षीदार शोधून न्यायालयात हजर केले आहे. अनेक साक्षीदारांना धीर देण्याबरोबरच सुरक्षाही दिली आहे. याचबरोबर गुन्ह्यातील पुरावे व कागदपत्रे कौशल्यापूर्वक आणि जबाबदारीने न्यायालयात सादर केले आहेत. त्यामुळे खून, ममोका, बलात्कार, विनयभंग, पॉस्को, विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटना व हाणामारी अशा घटनांतील 23 गुन्हेगारांना शिक्षा मिळाली आहे. त्यांच्या या कामगिरीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दखल घेऊन नुकताच गुणगौरव केला आहे.
आपल्या या कामाबद्दल ललिता कानवडे सांगतात की नागरिकांना न्याय मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप समाधान वाटते. आपण काहीतरी चांगले काम केल्याची ती पोच पावती असते. साक्षीदार व पीडितांनी न्यायासाठी न्यायालयात हजर राहणे खूप महत्त्वाचे असते. पुढेही न्यायालयाच्या माध्यमातून सामान्यांना न्याय य मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे त्या सांगतात. दरम्यान आपल्याया कामात पुणे शहर पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्रकुमार शिंदे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.