तुमची बहीण मारली, आमदाराचं नाव लिहीत विवाहितेनं प्रियकरासह संपवलं जीवन; प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्यांकडून यायच्या धमक्या
गावकऱ्यांनी प्रेम प्रकरणाला विरोध केल्यानं महिलेसह प्रियकरानं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय. विवाहित महिलेसह प्रियकराला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्या प्रकरणी १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येआधी महिलेनं सुसाइड नोट लिहिली असून त्यात नावेही लिहिली होती. त्यावरून पोलिसांनी नांदगावमध्ये १६ जणांवर कारवाई केलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातल्या नस्तनपूर इथं प्रेमी युगुलाने रेल्वेखाली झोकून देत आयुष्य संपवलं. प्रेम प्रकरणाला विरोधातून अनेकदा धमक्या दिल्या गेल्यानंतर शेवटी दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. शनिदेव मंदिराजवळ रेल्वेखाली झोकून देत त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी १६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला रामकृष्ण खताळ आणि ज्ञानेश्वर माधव पवार यांच्यात प्रेमसंबंध होते. पण गावातल्या काही लोकांचा दोघांच्याही नात्याला विरोध होता. गावातील लोकांनी दोघांनाही आत्महत्या करा नाहीतर ठार मारू अशी धमकी दिली होती. सततचा त्रास आणि धमक्यांना कंटाळून शेवटी दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. सुसाइड नोटमध्ये त्यांनी याबाबत लिहिलं आहे. आत्महत्येआधी महिलेनं सुसाइड नोट लिहिताना त्यात आमदार सुहास कांदे यांचं नाव लिहित तुमची बहिण मारली असल्याचं म्हटलंय.
प्रेम करणं हा गुन्हा नाही. आम्ही कुणाला त्रासही दिला नाही. आम्हाला मरायचं नव्हतं, खूप जगण्याची इच्छा होती. आमदार साहेब, संजय पवार आणि अधिकारी आमच्या बाजूने आहेत. तुम्हाला मारून टाकलं तरीही कुणी आमचं वाकडं करणार नाही अशा धमक्या आम्हाला दिल्या जात होत्या असं सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.