कृषी पर्यटन केंद्र सुरू करा अन् शासनाच्या 'या' योजनांचा लाभ मिळवा; पात्रता, अर्जप्रक्रिया जाणून घ्या
मुंबई : आपण कोणताही व्यवसाय सुरू करताना आर्थिक मदत आणि अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यासाठी व्यवसायाची अधिकृत नोंदणी असणे तितकेच आवश्यक आहे. कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करताना विविध परवाने आणि प्रमाणपत्रांसाठी नोंदणी करणे गरजेचे असते.नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती घेण्यापूर्वी, कृषी पर्यटन केंद्रांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध लाभांविषयी जाणून घेऊया.
कृषी पर्यटन केंद्रांसाठी शासनाचे कोणते लाभ मिळतात?
1)कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
2)नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे केंद्र चालकांना बँकांकडून कर्ज मिळण्यास सुलभता मिळेल.
3) नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रांना पर्यटन धोरण-2016 अंतर्गत वस्तू आणि सेवा कर, वीज दर (मुद्रांक शुल्क सवलत वगळता) यांसारख्या सवलती मिळतील.
4) जलसंधारण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शेततळे योजनेत कृषी पर्यटन केंद्रांना प्राधान्य दिले जाईल.
5) ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यांसारख्या योजनांचा लाभ नोंदणीकृत केंद्रांना मिळू शकेल.
6) ज्या केंद्रांमध्ये घरगुती स्वयंपाकगृह असेल, त्यांना घरगुती गॅस जोडणीचा लाभ मिळेल.
7) कृषी पर्यटन केंद्रांसाठी घरगुती वीज दर लागू करण्याचा विचार केला जाईल.
प्रशिक्षण व मार्गदर्शन यामध्ये अन्न सुरक्षा, स्वच्छता, आतिथ्य, प्रसिद्धी आणि विपणन,आदर्श शेती पद्धती आणि अनुभवाधारित पर्यटन या विषयांवर अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल. कृषी पर्यटन केंद्रांना शासनामार्फत प्रसिद्धी दिली जाईल. नोंदणीकृत केंद्रांची माहिती पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. विपणनासाठी खासगी आणि शासकीय मार्ग तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. आठ खोल्यांपर्यंतच्या केंद्रांसाठी नगररचना विभागाची परवानगी आवश्यक राहणार नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
कृषी पर्यटन केंद्रासाठी नोंदणी करण्यासाठी पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तसेच प्रादेशिक उपसंचालक, पर्यटन संचालनालय कार्यालयातही अर्ज उपलब्ध असतात.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराच्या जमिनीचे कागदपत्रे (7/12 उतारे, 8अ)
वैयक्तिक शेतकरी वगळता इतरांसाठी कायदेशीर नोंदणी प्रमाणपत्र
अधिकृत संस्थांनी अर्ज करण्यासाठी प्राधिकरण पत्र
आधार कार्ड/पॅन कार्ड
वीज बिल
नोंदणी शुल्क भरल्याचा पुरावा (www.gras.mahakosh.gov.in वर भरता येईल)
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवाना (Food License)
लोकनिवास (Dormitory) असल्यास बांधकाम परवानगीचे प्रमाणपत्र
नोंदणी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया कशी आहे?
ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी केली जाईल.
पर्यटन उपसंचालक आणि कृषी विभाग प्रतिनिधी स्थळ पाहणी करतील.
आवश्यक बाबी पूर्ण झाल्यास उपसंचालकांकडून नोंदणी प्रमाणपत्र दिले जाईल.
धोरणातील अटी पूर्ण न झाल्यास नोंदणी नाकारण्याचा अधिकार उपसंचालकांना राहील.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास नोंदणी प्रमाणपत्र निलंबित किंवा रद्द केले जाऊ शकते.
ही सेवा लोकसेवा हक्क अधिनियमान्वये अधिसूचित करण्यात येईल.
नोंदणी शुल्क किती?
प्रथम नोंदणीसाठी रु. 2,500
प्रत्येक पाच वर्षांनी नूतनीकरण शुल्क रु. 1,000
कृषी पर्यटन नोंदणीमुळे व्यवसाय अधिकृत होत असून त्याचा फायदा शासनाच्या विविध योजनांद्वारे घेतला जाऊ शकतो. त्यामुळे इच्छुक व्यावसायिकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.