राजीनामा देऊन धनंजय मुंडेंच्या अडचणी संपल्या नाहीयेत.. मुंडेंवर थेट 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. धनंजय मुंडेंचा थेट खंडणीप्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशातच खुद्द वाल्मिक कराडंच धनंजय मुंडेविरोधात कोर्टात साक्ष देईल का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांमागचं कारण काय? खरंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंविरोधात साक्ष देऊन शकतो का? धनंजय मुंडेंवर नेमके काय आरोप होतायत? यातून धनंजय मुंडेंच्या अडचणी कशा वाढू शकतात? याचाच सविस्तर आढावा या बातमीतून घेणार आहोत.
धनंजय मुंडेच्या अडचणीत आणखी वाढ?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गेले तीन महिने राज्यभर चर्चेत आहे. सोमवारी या हत्याकांडाचे अतिशय क्रूर असेल फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला आणि अखेर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. परंतु धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. कारण एकीकडे संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणामुळे झाली, असा दावा पोलिसांनी केज कोर्टाला सादर केलेल्या चार्जशिटमधून केला आहे, तर दुसरीकडे याच खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. एवढंच नाही तर खंडणीसाठी झालेली महत्वाची बैठक धनंजय मुंडेंच्या हजेरीत सातपुडा बंगल्यावर झाली असा मोठा आणि खळबळजनक आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे.
धस आणि जरांगेंकडून आरोपांच्या फैरी
एकीकडे सुरेश धस धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका स्विकारली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचे धनंजय मुंडे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत आणि आरोपींनी सगळंकाही धनंजय मुंडे यांच्याच सांगण्यावरून केले, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच वाल्मिक कराडने आणि त्याच्या कुटुंबियांनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलं पाहीजे असा सल्ला देखील त्यांनी आरोपी कराडला दिला आहे.
जरांगे पाटलांचा कराड कुटुंबाला सल्ला
वाल्मिक कराड आणि धनंजय यांचे किती जवळचे संबंध आहेत हे आता लपून राहिलेले नाही. वाल्मिक कराडने सुरुवातीच्या काळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या घरात घरगडी म्हणून काम केले. मुंडे घराण्यात फूट पडल्यानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंची साथ दिली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत आहे आणि तो मुंडेंचा निष्ठावान असल्याचे बोलले जाते. याच कराडला आणि त्याच्या कुटुंबियांना जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंविरोधात जबाब देण्याचा सल्ला दिला आहे. आता यावर वाल्मीक कराड काय करणार? खरंच धनंजय मुंडे यांच्याविरोधात साक्ष देणार की याप्रकरणापासून धनंजय मुंडेंना दूर ठेवणार? हे लवकरच कळेल. परंतु या प्रकणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत हे नक्की.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.