१४४ वर्षांनी आलेल्या ऐतिहासिक महाकुंभ मेळ्याची सांगता २६ फेब्रुवारी रोजी झाली. देशासह जगभरातील भाविक उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभात स्नान करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेश सरकारने कोट्यवधि
भाविकांसाठी मोठी व्यवस्था केली होती. मात्र मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या
चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे योगी सरकारच्या
नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून
चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली योगी आदित्यनाथ यांनी दिली.
महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची माहिती लपवल्याची कबुली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. उलटसुलट बातम्यांमुळे तिथे असलेले ८ कोटी भाविकही घाबरले असते, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल मुख्यमंत्री योगी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.आयआयएम अधिकारी आणि भारतीय टपाल सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीला योगी आदित्यनाथ बोलत होते. "आम्ही या घटनेची जास्त प्रसिद्धी होऊ दिली नाही, कारण त्यावेळी प्रयागराज आणि कुंभमेळा परिसरात आठ कोटी भाविक आणि संत उपस्थित होते आणि अराजकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकली असती. चेंगराचेंगरीची घटना २९ जानेवारीच्या रात्री १:१५ ते १:३० च्या दरम्यान घडली. त्यावेळी कुंभमेळा परिसरात सुमारे ४ कोटी लोकांची गर्दी होती. चेंगराचेंगरी होताच, जखमींना १५ मिनिटांत रुग्णालयात नेण्यात आले, असं योगींनी म्हटलं.
"लाखो भाविकांसोबतच १३ आखाड्यातील संतही त्या दिवशी सकाळी अमृतस्नानासाठी सहभागी होणार होते. अशा कार्यक्रमांच्या आयोजनावेळी दोन प्रमुख समस्या अनेकदा उद्भवतात. एक म्हणजे संतांच्या आंघोळीचा क्रम ठरवणे आणि दुसरे म्हणजे पहाटे ४ वाजता विधी सुरळीतपणे पार पडेल याची खात्री करणे. चेंगराचेंगरीची ही घटना घडल्यामुळे सर्व आखाडे स्नानासाठी तयार असतानाही प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांच्या स्नानाचा कार्यक्रम पुढे ढकलला. परिस्थिती हाताळण्यासाठी मी त्यांना स्वतःहून विधी पुढे ढकलण्याची विनंती केली होती,"
"चेंगराचेंगरीनंतर अधिकाऱ्यांनी गर्दीवर बारीक लक्ष ठेवले. त्यानंतर संगम परिसर दुपारपर्यंत रिकामा केला आणि दुपारी २.३० पासून आंघोळ पुन्हा सुरू होईल याची तयारी केली. अशावेळी कठीण परिस्थितीत अनेक लोक घाबरतात आणि हार मानतात, पण संयम आणि नियंत्रणाने ठोस निर्णय घेण्याची शक्ती आपण विकसित केली पाहिजे," असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.