Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'...त्याने पंगा घेतलाय', कुणाल कामराच्या कॉमेडीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

'...त्याने पंगा घेतलाय', कुणाल कामराच्या कॉमेडीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
 

मुंबई: स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी आपल्या युट्यूब चॅनेलवर 'नया भारत' नावाचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यात त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. त्याने काही बॉलिवूड गाण्यांचा आधार घेत पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जहरी टीका केली. या टीकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी होत आहे.


यावरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. स्वत: कामराने एक अकाऊंटवर निवेदन जारी करत आपण माफी मागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कुणाल कामराच्या कॉमेडीमागं कोण आहे, हे पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते एका मराठी चॅनेलशी संवाद साधत होते.

कुणाल कामराने केलेल्या विनोदी गाण्यावर प्रतिक्रिया विचारली असता एकनाथ शिंदे म्हणाले, "लोकशाहीत अभिव्यक्ती स्वतंत्र गरजेचं आहे. पण त्याचा अर्थ बदलून कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाला तरी चुकीचं ठरवणं, चुकीचं आहे. माझी गोष्ट सोडून द्या, पण त्याने पंतप्रधान मोदी, सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश, अर्थमंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील तो बोलला आहे. काही उद्योगपतींवरही तो बोलला आहे. तुमच्यासारख्या अनेक पत्रकारांचा देखील त्याने पंगा घेतला आहे. काही एअरलाईन्सने तर त्याला बॅन केलं आहे. असं वातावरण खराब करणाऱ्या आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तीच्या मागे कोण आहे? हे पाहावं लागेल."
शिवसैनिकांनी केलेल्या स्टुडिओच्या तोडफोडीवर एकनाथ शिंदे म्हणाले, "एकनाथ शिंदे खूप संवेदनशील माणूस आहे. मी कोणत्याही अॅक्शनवर रिअॅक्शन दिली नाही. माझ्यावर तर कित्येक आरोप लावले. अडीच वर्षांपासून आरोपच आरोप केले जातायत. आताही आरोप करतायत. आता तर त्यांना लोकांनी दाखवून दिलंय, मी आरोपांचं उत्तर कामातून देतो, त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. तरीही ते सुधारत नाहीयेत. मी तोडफोडीचं समर्थन करत नाही, ती कार्यकर्त्यांची भावना आहे."



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.