बेळगाव : प्रेमप्रकरणातून जन्मलेल्या अर्भकाचा खून केल्याचा गुन्हा प्रेमीयुगुलावर दाखल झाला आहे. 5 मार्च रोजी कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी येथे नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला होता. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर पोलिसांनी या प्रेमीयुगुलाचा शोध घेत रविवारी त्यांना अटक केली.
महाबळेश्वर कामोजी (वय 31) व सिमरन माणिकभाई (22, दोघेही रा. अंबडगट्टी) अशी अटक केलेल्या संशयित प्रेमीयुगुलाची नावे आहेत. याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेली माहिती अशी की, उपरोक्त संशयित तरुण व तरुणी अंबडगट्टी येथे एकाच गल्लीत राहतात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. यातून त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यातून सिमरन गर्भवती राहिली. विशेष म्हणजे गर्भवती असल्याचे सिमरनने तब्बल नऊ महिने घरच्यांना अथवा इतर कोणालाही समजू दिले नाही.
व्हिडीओ कॉलद्वारे प्रसूती
5 मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास सिमरनच्या पोटात दुखू लागले. प्रसूतीची लक्षणे दिसू लागल्यानंतर ती थेट बाथरूममध्ये गेली. तिने प्रियकर महाबळेश्वरला व्हिडीओ कॉल लावत सर्व प्रकार सांगितला. तो कॉलवर ज्या पद्धतीने मार्गदर्शन करेल त्यानुसार तिने बाळाला जन्म दिला. महाबळेश्वरने सांगितल्यानुसार नाळ कापून काढत सदर अर्भकाला तिने एका पोत्यात घातले. यावेळी बाळ ओरडू नये अथवा त्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिने त्याचे तोंड दाबून धरले होते. घाईत पोत्यात भरताना त्याच्या डोकीलाही मार लागल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. यानंतर तिने हे पोते महाबळेश्वरला बोलावून त्याच्याकडे दिले. त्याने हे पोते नेऊन गावच्या बाजूलाच असलेल्या शेतवडीतील उकीरड्यावर फेकून दिले. तोपर्यंत बालक मृत झाले होते. ही माहिती कित्तूर पोलिसांना मिळताच निरीक्षक शिवानंद व उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर हे अर्भक येथे कोठून आले, याचा शोध सुरू झाला.
उत्तरीय तपासात स्पष्ट
दोन आठवड्यांनंतर याअर्भकाचा उत्तरीय तपासणी अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. यामध्ये सदर बालकाच्या डोकीला जखम झाल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांनी याची सखोल चौकशी केली. यावेळी संशयावरून उपरोक्त तरुणीला ताब्यात घेतले. यावेळी तिने घडलेला प्रकार सांगत हे बाळ आपलेच असल्याचे कबूल केले. पोलिसांनी आधी बेवारस अर्भक रस्त्यावर मिळणे व कोणीतरी फेकणे यानुसार भारतीय न्याय संहिता 94 अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यानंतर मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रेमीयुगुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला. दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली.
पोलिसांसमोर आव्हान
नवजात अर्भक सापडल्यानंतर पोलिसांना ते कोणाचे हे समजल्याशिवाय पुढील तपास करता येणे अशक्य होते. परंतु, उत्तरीय तपासणीच्या अहवालात डोक्यात जखम असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांना एक दिशा मिळाली. अनैतिक संबंधातून हे प्रकरण घडले असण्याच्या शक्यतेने एक आव्हान म्हणून कित्तूर पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना यश आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.