वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) साठी ऑनलाइन नोंदणी करताना सायबर फसवणुकीची शक्यता वाढली आहे. बनावट लिंक आणि वेबसाईटच्या माध्यमातून वाहनचालकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच नोंदणी करावी, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. या संदर्भात सहा बनावट वेबसाईटविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ऑनलाइन नोंदणी करताना सतर्क राहा!
तुम्ही वाहनाच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) साठी ऑनलाइन नोंदणी करत आहात का? तर सावधान! फसवणुकीचा धोका टाळण्यासाठी अधिकृत परिवहन विभागाच्या वेबसाईटवरूनच नोंदणी करत असल्याची खात्री करा. सायबर गुन्हेगारांनी बनावट लिंक आणि वेबसाईट तयार करून वाहनधारकांची फसवणूक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. शुल्काच्या बहाण्याने वाहनचालकांकडून पैसे उकळले जात असून, याप्रकरणी परिवहन विभागाच्या तक्रारीनंतर दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी HSRP आवश्यक
वाहनांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वाहनांची ओळख पटवणे सोपे होईल, तसेच बनावट नंबरप्लेटचा गैरवापर रोखता येईल. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या परिवहन विभागाकडून यासंबंधी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक
राज्यात विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) वाहनधारकांकडून बनावट HSRP बाबत तक्रारी येत आहेत. यानुसार, परिवहन आयुक्तालयाच्या वतीने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यावर कारवाई सुरू आहे. सध्या सहा वेबसाईट बनावट असल्याचे आढळून आले आहे. वाहनधारकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच HSRP साठी नोंदणी करावी, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.
अधिकृत नोंदणीसाठी तीन संस्थांची नियुक्ती
परिवहन आयुक्तालयाने HSRP साठी तीन अधिकृत उत्पादक संस्थांची नियुक्ती केली आहे. या संस्थांच्या पोर्टलद्वारे नव्या नंबरप्लेटसाठी नोंदणी करता येईल. मात्र, गेल्या काही दिवसांत अधिकृत पोर्टल व्यतिरिक्त अनेक बनावट वेबसाईट आणि लिंक तयार करून वाहनधारकांची फसवणूक केली जात असल्याचे आढळले. ही बाब संबंधित कंपन्यांनी परिवहन आयुक्तालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिवहन विभागाने या फसवणुकीविरोधात तातडीने कारवाई करत सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला आहे. नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवरूनच नोंदणी करून फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.