वाघबीळ येथे दोन गटांत झालेल्या मारहाणप्रकरणी 18 तरुणांना अटक
कोडोली : पन्हाळा तालुक्यातील एका महाविद्यालयामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून वाघबीळ येथे झालेल्या तुफान दगडफेक व मारहाणीत दोघेजण जखमी झाले. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, कोडोली पोलिसांनी दोन्ही गटांच्या 18 तरुणांना अटक केली आहे. पन्हाळा तालुक्यातील एका महाविद्यालयातील प्रथमेश पाटील व सर्वेश डोंगळे या दोन तरुणांच्या गटांमध्ये सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान किरकोळ वाद झाला होता. हा वाद महाविद्यालयातील काहींनी मध्यस्थी करून मिटवलाही होता. त्यानंतर प्रथमेश प्रवीण पाटील (वय 20, रा. पिंपळे, ता. पन्हाळा) हा आपल्या मित्रांसोबत सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वाघबीळ येथील चहाच्या टपरीजवळ थांबला होता. यावेळी सर्वेश संजय डोंगळे (वय 19, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर) हा आपल्या मित्रांसोबत तेथे आला.
यावेळी दोन्ही गटांकडून काठीने मारहाण करण्यास सुरुवात झाली. तसेच, तुफान दगडफेकही झाली. मारहाणीत डोंगळे गटातील संकेत संजय डोंगळे, तर पाटील गटातील सुशांत नाईक हे दोघे जखमी झाले आहेत. प्रथमेश प्रवीण पाटील याच्या फिर्यादीवरून सर्वेश संजय डोंगळे, संकेत संजय डोंगळे हे दोघे सख्खे भाऊ (रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कोल्हापूर), ऋषीकेश युवराज पाटील (रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर), सिद्धेश तानाजी वीर (रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर), श्रेयश शिवाजी पाटील (रा. गोठे, ता. पन्हाळा), ओमकार शेलार (रा. कुडित्रे, ता. करवीर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वेश संजय डोंगळे याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय सावंत, आदिनाथ पाटील, प्रदीप पाटील, अक्षय मगदूम, अमित संकपाळ, सुशांत नाईक, प्रमोद पाटील, संदीप जगदाळे, वैभव मगदूम, यश जाधव, विशाल सावंत (सर्व रा. जाफळे, ता. पन्हाळा) व प्रथमेश पाटील (रा. पिंपळे, ता. पन्हाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक व फौजदार नामदेव दांडगे अधिक तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.