Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लातूरमध्ये आठ वर्षांत दुसरा ग्रीन कॉरिडॉर; पहिला झाला तरुणाच्या अवयवदानासाठी, आता आयुक्तांच्या उपचारासाठी

लातूरमध्ये आठ वर्षांत दुसरा ग्रीन कॉरिडॉर; पहिला झाला तरुणाच्या अवयवदानासाठी, आता आयुक्तांच्या उपचारासाठी


लातूर : येथील महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी सोमवारी (ता. सात) येथे ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. याकरिता सह्याद्री रुग्णालय ते विमानतळ हा सतरा किलोमीटरच्या अंतरावर 'नो मॅन्स लॅण्ड' करण्यात आले होते. गेल्या आठ वर्षांत हा दुसरा ग्रीन कॉरिडॉर होता. पहिला ग्रीन कॉरिडॉर २०१७मध्ये एका तरुणाचे अवयव नेण्यासाठी होता, तर आजचा ग्रीन कॉरिडॉर मनोहरे यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी होता. मनोहरे यांनी शनिवारी (ता. पाच) रात्री कौटुंबिक वादातून डोक्यात गोळी झाडून घेतली होती.

 
त्यांच्या मेंदूतून ही गोळी आरपार गेली होती. त्यांच्यावर गेली दोन दिवस येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात नेण्याचा निर्णय झाला. पोलिसांनी सोमवारी (ता. सात) सकाळी सह्याद्री रुग्णालय ते विमानतळ हा सतरा किलोमीटरचा टप्पा ग्रीन कॉरिडॉर तयार केला. सकाळी अकरापासून या रस्त्यावरील सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती.

रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिकेत मनोहरे यांना ठेवल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास ग्रीन कॉरिडॉरला सुरवात झाली. पुढे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम यांचे वाहन होते. या रुग्णवाहिकेसोबत दुसरी एक साहित्य असलेली रुग्णवाहिका होती. अन्य तीन-चार वाहने होती. सायरन वाजवत या सर्व गाड्या विमानतळावर पोचल्यानंतर मनोहरे यांना एअर अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आले.
अधिकारी, डॉक्टरांचे लक्ष

आयुक्त मनोहरे यांना मुंबईला नेताना विमानतळावर काही अडचण येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते; तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुनील हळीकर व डॉ सदानंद कांबळे हे डॉक्टर एअर अॅम्ब्युलन्सने मनोहरे यांच्यासोबत गेले आहेत.

दुसरा ग्रीन कॉरिडॉर

येथे २०१७ मध्ये ब्रेनडेड झालेल्या किरण लोभे या तरुणाचे अवयदान करण्यात आले होते. त्यावेळी त्याचे हृदय व इतर अवयव मुंबईला नेण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते विमानतळ असा ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. आठ मिनिटांत त्याचे अवयव विमानतळावर नेण्यात आले होते. सोमवारी (ता. सात) आयुक्त मनोहरे यांना मुंबईला उपचारासाठी नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. खराब रस्ता व रुग्ण असल्याने सुमारे २५ मिनिटांत त्यांना विमानतळावर नेण्यात आले.

 

असा होता ग्रीन कॉरिडॉर

सह्याद्री रुग्णालय ते विमानतळ अंतर १७ किलोमीटर

अतिदक्षता विभागातून आयुक्त मनोहरे यांना बाहेर काढले. स. १०.५० वा.

कार्डियाक रुग्णवाहिकेत मनोहरे यांना ठेवले स. १०.५५

सह्याद्री रुग्णालयातून रुग्णवाहिका बाहेर पडली

स. १०.५७

छत्रपती चौकात रुग्णवाहिका स. ११.०२

पीव्हीआर चौकात रुग्णवाहिका

स. ११.०८

बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर रुग्णवाहिका ...... स. ११.१२

रेल्वे उड्डाणपुलावर रुग्णवाहिका

स. ११.१४

विमानतळ टी पॉइंटवर रुग्णवाहिका स. ११.१९

विमानतळावर रुग्णवाहिका

स. ११.२२

एअर अॅम्ब्युलन्सचे टेकऑफ.. स. ११.५५

मुंबईतील ग्रीन कॉरिडॉर

सार्ताक्रुझ विमानतळ ते कोकिळाबेन रुग्णालयाचे अंतर -७ कि.मी.

सातांकुझ विमातळावर विमानाचे लॅण्डिंग- दुपारी १.०३

विमानतळावरून कोकिळाबेन रुग्णालयाकडे रुग्णवाहिका- दु. १.१०

कोकिळाबेन रुग्णालयात रुग्णवाहिका पोचली दु. १.३३

असा होता पोलिस बंदोबस्त

पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक पाच, उपनिरीक्षक दहा, पोलिस कर्मचारी ८६, गृहरक्षक दलाचे जवान ९०, पोलिसांची वाहने ११




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.