किरीट सोमय्यांच्या ठिय्यानंतर प्रशासन खडबडून जागे; १४ जणांवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
बीड : परळी येथे जन्मदाखले देण्यात बोगसगिरी झाल्याचा आरोप करत तहसीलदार, नायब तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. किरीट सोमय्या हे परळी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या मांडून बसले होते. त्यानंतर आता परळीतील महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महसूल अधिकाऱ्यांनी चौदा जणांविरुद्ध चुकीचे दस्तऐवज सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्म व मत्यु प्रमाणपत्र मिळणेसाठी परळी येथे रहिवासीचा मृत्यु बाबतचा कोणताही ठोस पुरावा सादर न करता परळी व सिरसाळा बाहेरील खोटे कागदपत्रे तहसील कार्यालय परळी वैजनाथ येथे सादर करून शासनाची फसवणूक केली, परळीचे जन्म व परळी येथे मृत्यु झाले बाबत प्रमाणपत्र हस्तगत करुन शासनाची फसवणूक केली म्हणुन महसूल प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तहसील कार्यालयातील सहाय्यक महसुल अधिकारी व्यंकट जयराम सुर्यबाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून सुमित विजयकुमार झंवर, वैखेमुंनबी इसामशहा सय्यद, सुनिल मारोती, शेख गफ्फार सत्तार, शाहीनबेगम युसुफ बक- यावाले, राजीव प्रकाश फड, महीबीशबेगम सिध्दीक आली शेख, अलीम अब्दुल सय्यद, शेख फारुख खमरोद्दीन (सर्व राहणार परळी) तसेच शेख गुलाम हबीब गुलाम मुस्तफा, फेरोजखा इसाकखा पठाण, शेख अजहर शेख बहीदोद्दीन, नितीन राजाभाऊ पौळ, अबदुस समंदखान खालेद, अब्दुल रहेमान खान सर्व रा. सिरसाळा या चौदा नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ हे करीत आहेत.
दरम्यान, किरीट सोमय्या १५ एप्रिल रोजी परळी वैजनाथ येथे आले होते. यावेळी ते म्हणाले होते की, मी हे प्रकरण उचलल्यानंतर आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर परळीचे तहसीलदार तक्रार देण्यास पुढे आले. मात्र, त्यांनी तक्रार दिली तरीही महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हे दोषी नाहीत असे होत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, तहसीलदार, नायब तहसीलदार व संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.