Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नांदेडमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग; चौघे वाचले, ४० लाखांचे नुकसान

नांदेडमध्ये फर्निचर गोडाऊनला भीषण आग; चौघे वाचले, ४० लाखांचे नुकसान


नांदेड : शहरातील माळटेकडी परिसरातील लक्ष्मीनगर येथे फर्निचर तयार करणाऱ्या एका गोडाऊनला मंगळवारी (ता. ८) सकाळी भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये झोपलेल्या चार मजुरांना अग्निशमन विभागाने प्रसंगावधान राखत वाचवले. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संबंधित मालकाने दिली आहे. 

लक्ष्मीनगर येथे मंगळवारी सकाळी नऊला रेल्वे पटरीजवळील एका फर्निचर बनविणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. अग्निशमन नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच एक अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी टिनशेडचे गोडाऊन जळत असल्याचे आढळले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडाऊनमध्ये रात्रपाळीतील चार कामगार झोपले होते. याची तातडीने दखल घेऊन अग्निशमन कर्मचाऱ्यांनी फायर व्हेनच्या विंचच्या सहाय्याने गोडाऊनचे शटर उघडून चार कामगारांना सुखरूप बाहेर काढले.

आग मोठ्या प्रमाणात असल्याने दुसऱ्या फायर टेंडरला पाचारण करण्यात आले. जवळपास दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या या गोडाऊनपर्यंत पाणी पोचण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेचे जेसीबी घटनास्थळी बोलावण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊनमधील टिनशेड हटवून मोकळे करण्यात आले. त्यामुळे आग विझवणे सोपे झाले आणि आग नियंत्रणात आली.

४० लाखांचे नुकसान

आगीत गोडाऊनमधील फोम, प्लायवुड, सोफा, शिलाई मशीन, खुर्चा आदी वस्तू जळून खाक झाल्या असून, सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती संबंधित मालकाने दिली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण कारवाईत अग्निशमन अधिकारी केसदासरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी नीलेश कांबळे, सूर्यवंशी, पंडित, टारपे, ताटे, पवळे, कदम व किरकन आदींनी परिश्रम घेतले. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.