Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

UPच्या राजकीय नेत्यावर दुर्मिळ थॅलियमचा विषप्रयोग, उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणले

UPच्या राजकीय नेत्यावर दुर्मिळ थॅलियमचा विषप्रयोग, उपचारासाठी एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणले
 

मुंबई :- सराईत गुन्हेगार हत्या करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरत असतात. अशीच एक क्लृप्ती वापरून उत्तर प्रदेशातील एका तरूण राजकीय नेत्याच्या हत्येचा झालेला प्रयत्न सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरला आहे.

धिम्या गतीने शरीरात भिनणाऱ्या विषाचा (स्लो पॉयझनिंग) युवा नेत्यावर प्रयोग करण्यात आला असून हा नेता सध्या एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी छात्र सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस वाराणसीतील युवा नेते संदीप सिंह स्वर्णकार  यांना अत्यवस्थ स्थितीत मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात २७ मार्च रोजी एअर ॲम्बुलन्सने दाखल करण्यात आले. संदीप हे अखिलेश यादव आणि मेरठचे आमदार अतुल प्रधान यांचे विश्वासू मानले जातात. स्वतः अखिलेश यादव दूरध्वनीवर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.

त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर येथील डॉक्टरांनी संदीपवर थॅलियम या दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या विषाचा प्रयोग झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर करण्यात आलेल्या विविध चाचण्यांमध्ये संदीप यांच्यावर थॅलियम विषाचा दीड महिन्यापूर्वी प्रयोग झाल्याचे सिद्ध झाले.त्यानंतर माहीम पोलिस स्टेशनमध्यै या प्रकरणाची लेखी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

२ मार्चला संदीपला सर्वप्रथम गुरूग्राम येथील रुग्णालयात आणि ८ मार्चला दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन्ही रुग्णालयातील डॉक्टरांना ते जीबीएस सिंड्रोमने आजारी असल्याचे वाटले. त्यांनी त्याप्रमाणे उपचार केले. मात्र दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत गेली आणि त्यामुळे अखेर कुटुंबियांनी संदीप यांना २७ मार्चला हिंदूजा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला.
राजकीय षडयंत्राची शंका

संदीप गेल्या २२ वर्षापासून युवक राजकारणात सक्रिय असून ते समाजवादी पक्षासोबत जोडलले आहेत. राजकीय कारणावरून त्याचा काटा काढण्यासाठी कुणी तरी त्याची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची शंका वर्तवण्यात येत आहे. थॅलियम हे साधारणतः अणू संशोधन केंद्रे अथवा अणुऊर्जा प्रकल्पांमध्येच आढळतात. सर्वसाधारणपणे सर्वसामान्यांना थॅलियम मिळणे अशक्य असते. त्यामुळे संदीप यांच्यावरील विष प्रयोगामागे कुण्या बड्या व्यक्तीचा हात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

थॅलियम: 'स्लो पॉइजन'चा धोकादायक प्रकार
थॅलियम हे एक अत्यंत विषारी रसायन असून त्याला 'पॉयजनरचे विष' असेही म्हणतात. हे रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असल्यामुळे ते अन्न अथवा पेयामध्ये सहज मिसळता येते आणि त्याचा अंदाज लागत नाही. डोकेदुखी, उलटी, जुलाब, मज्जासंस्थेचे कार्य बिघडणे आणि स्मृती कमी होणे असे याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात. त्याचे दीर्घकाळ सेवन झाल्यास व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते.
Thallium poisoning | थॅलियम कसे कार्य करते?

थॅलियम खाल्ल्यानंतर लगेच मृत्यू होत नाही. हे विष अत्यंत हळूहळू शरीरावर परिणाम करते. सुरुवातीला डोकेदुखी, उलटी, आणि जुलाब यासारखे सामान्य लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे हे विष दिले गेले आहे, हे कुणालाही सहज समजत नाही. हळूहळू हे विष शरीराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम करू लागते. सर्वात आधी याचा प्रभाव मज्जासंस्थेवर होतो. व्यक्तीची विचारशक्ती आणि आकलन क्षमता कमजोर होते. स्मरणशक्ती कमी होऊ लागते. यानंतर हे विष स्नायूंवर परिणाम करते. काही दिवसांच्या विषप्रयोगानंतर पूर्ण शरीरामध्ये तीव्र अशक्तपणा जाणवू लागतो.

थॅलियमचा गुन्हेगारी वापराची प्रकरणे
भारतामध्ये थॅलियम वापरून खून करण्याचे काही प्रसंग घडले आहेत. गडचिरोलीत एका २२ वर्षीय कृषी वैज्ञानिक तरुणीने आपल्या नवऱ्याला आणि सासरच्या चार नातेवाईकांना थॅलियम देऊन मारले होते. तिने हे विष तेलंगणातून मागवले होते आणि इंटरनेटवर याचा वापर कसा करायचा हे शोधले होते. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने तेव्हा खळबळ माजली होती. दिल्लीतील एका व्यक्तीने २०२१ मध्ये आपल्या पत्नीला आणि सासरच्या लोकांना थॅलियम मिसळलेले अन्न खाऊ घातले. त्यामध्ये त्याच्या सासू आणि मेव्हणीचा मृत्यू झाला, आणि पत्नी कोमामध्ये गेली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.