Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाडक्या बहीण योजनेसाठी मागासवर्गीय अन् आदीवासींचा निधी वळवला; खात्याचे मंत्री संजय शिरसाटांचा संताप, म्हणाले, 'खातं बंद केलं तरी चालेल...'

लाडक्या बहीण योजनेसाठी मागासवर्गीय अन् आदीवासींचा निधी वळवला; खात्याचे मंत्री संजय शिरसाटांचा संताप, म्हणाले, 'खातं बंद केलं तरी चालेल...'
 

मुंबई: राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रूपयांची मदत जमा होण्यास सुरूवात झाल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असतानाच, महायुती सरकारची मात्र या योजनेला निधी मिळवताना चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आले आहे.  दोन कोटी लाभार्थींना दरमहा आर्थिक मदत देण्यासाठी सरकारला इतर खात्यांचा निधी वळवावा लागत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. दोन्ही विभागांचे अनुक्रमे 410 कोटी 30 लाख आणि 335 कोटी 70 लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले. काल (शुक्रवारी) यासंबंधिचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आल्याने खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

...तर खातं बंद केले तरी चालेल

निधी वळवल्याच्या प्रश्नावरती बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुमच्या माध्यमातून कळले जवळपास सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आले आहेत, याची मला कल्पना आणि माहिती नाही. सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर खातं बंद केले तरी चालेल, असं म्हणत शिरसाटांनी संताप व्यक्त केला आहे. मला याची काहीच कल्पना नाही, याबाबत मी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेल, फायनान्स डिपार्टमेंट आपली मनमानी चालवत आहे, आपण म्हणू तेच खरं म्हणत आहेत. या खात्याचा कायदेशीर निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही, फायनान्स डिपार्टमेंटवाले आपले डोके जास्त चालवत असतील तर हे बरोबर नाही, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी समाज कल्याण खाते कशासाठी निर्माण झालं आहे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाहीत का? हे मला पटलेलं नाही, मुख्यमंत्री चर्चा करेल. माझे मागचे वर्षीचे दायित्व 1500 कोटी रुपयांचे आहे. इतर खात्याचे वर्ग झाले की काय माहिती नाही. मात्र, सामाजिक खात्याचे पैसे वर्ग झाले हे सत्य आहे, असं म्हणत खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

खात्याचा निधी इतर ठिकाणी वर्ग करता येत नाही

तर पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, माझ्या खात्याचा निधी तुम्हाला इतर ठिकाणी वर्ग करता येत नाही, हा नियम आहे. कायदा आहे. फायनान्स काही जण बसले आहेत, त्यांना जर आपण हुशार आहोत असं वाटत असेल तर त्यांनी मला हे दाखवलं पाहिजे, आणि नियम द्या मला निधी वर्ग करता येतो म्हणून जर करता येत असेल तर मी त्यांची माफी मागेन, लाडकी बहिण लाडकी आहे, फायनान्समध्ये बसलेले शकुनी आहेत, त्यांनी केलेले हे काम आहे, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे.

अंबादास दानवेंचा निधी वळवल्याने हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निधी वळवल्याच्या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मिडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे. "लाडक्या बहिणीचा हफ्ता भरायला सरकारने आदिवासींच्या वाट्याचे पैसे पळवले! सरकारी तिजोरी कोरडी होत चालली आहे! सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी मंजूर 3,960 कोटींपैकी 410 कोटी 30 लाख रु. तसेच आदिवासी विकास खात्याला दिलेल्या 3,420 कोटींच्या सहाय्यक अनुदानातून तब्बल 335 कोटी 70 लाख रुपये लाडकी बहिण योजनेसाठी खेचले! अश्या प्रकारे आदिवासी विभागाच्या वाट्याचे एकूण 746 कोटी रुपये पैसे सरकारने खेचून नेले! नियम: नियोजन आयोगाच्या नियमानुसार, आदिवासी आणि सामाजिक न्याय या दोन खात्यांना दिला जाणारा निधी त्या समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरतो. हा निधी त्या संवर्गावरच खर्च करणे बंधनकारक असते तो इतर खात्यांमध्ये वळवता येत नाही", अशी पोस्ट शेअर करत निधी वळवता येत नाही असं सांगत त्यासंबंधीचा नियम देखील दानवेंनी आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.