जळगावमधील दोन क्रिकेटपटू ठार; अपघातात ११ खेळाडू जखमी, एकदम मोठा आवाज अन्..
सोनई : पुण्याजवळील गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्र प्रीमियर लीगचा सामना पाहून अतिशय आनंद आणि स्टेडियममधील फटकेबाजी बद्दल एकमेकात आनंद व्यक्त करत निघाले होते. जेवण अन् गप्पा झाल्यानंतर सर्वजण झोपले आणि एकदम मोठा आवाज झाला.
आनंदी चेहऱ्यांचे रुपांतर रडण्यात व ओरडण्यात झाले. अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील उस्थळ दुमाला (ता. नेवासे) येथील किसनगिरीबाबा विद्यालयाच्या समोर झालेल्या अपघातात दोन उदयोन्मुख क्रिकेटपटू ठार झाले, तर इतर अकरा खेळाडू जखमी झाले आहेत.
सोमवारी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात प्रवाशी वाहनमधील प्रथमेश योगेश तेली (वय १४) व वृषभ बबन सोनवणे (वय १६) या दोघांचा मृत्यू झाला आहे. उदय कोल्हे, वंश अग्रवाल, रोहन बेगाने, साई जाट, प्रतीक धुमक, हर्षल महाजन, आगम खिंवसरा, आरव शेळके, प्रद्युम्न कुलकर्णी, कुश घाटे, चिन्मय भोई (सर्व रा. बोदवड, जि. जळगाव) कमी अधिक प्रमाणात जखमी झाले आहेत.
केसरी स्पोर्टस अकॅडमीमध्ये क्रिकेटचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर भयंकर प्रसंग ओढवल्याने घटनास्थळी व रुग्णालयात आज पालक व ग्रामस्थांचा टाहो सुरू होता. केसरी अकॅडमीचे प्रशिक्षक गौरव भोई यांनी नेवासे पोलिस ठाण्यात ट्रक विरुद्ध फिर्याद दिली आहे. फौजदार शैलेश ससाणे तपास करीत आहेत.
रविवारी प्रशिक्षक भूषण भोई, अक्षय माळी व विद्यार्थ्यांनी रत्नागिरी विरुद्ध सोलापूर क्रिकेट सामना पाहून रात्री बारा वाजता तेथून निघालो. रस्त्याने सर्व विद्यार्थी खूप आनंदात होते. काळजी म्हणून चालकास पेट्रोल पंपावर मुक्काम करण्याची विनंती केली; मात्र त्याने तोंडावर पाणी मारून व चहा घेऊन जाऊ म्हटला आणि एक तासाने आमचे वाहन ट्रकला मागून धडकले. नेवासे पोलिसांनी खूप चांगली मदत केली.
- गौरव भोई, प्रशिक्षक, केसरी अकॅडमी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.