धुळे विश्रामगृहावर आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या कक्षात १.८४ कोटी रुपयांची रोकड सापडली. यामध्ये आता प्राप्तिकर विभागानेही उडी घेतली आहे. ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल सीसीटीव्ही फुटेज तपासले. या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावर त्यांनी थेट आरोप केला. आमदार खोतकर यांना देण्यासाठी खंडणी स्वरूपात धुळे जिल्ह्यातील विविध घटकांकडून १५ कोटी रुपये संकलित करण्याचे टार्गेट देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
पोलिस अधिक्षक धिवरे यांनी शासकीय विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेज वरून ११ संशयीत निश्चित केले आहेत. त्या फुटेजची तपासणी बुधवारी प्राप्तिकर विभागाने देखील केली. प्राप्तिकर विभागाचे तपास अधिकारी स्वामी यांनी याबाबत पोलिस अधिक्षक कार्यालयात विविध माहिती घेतली. विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि त्यांचे सहकारी यांच्यासाठी धुळे जिल्ह्यातील आणि शहरातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये जमा करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याने अवघ्या तीन तासात १.४७ कोटी रुपये जमा केले. या पैशाच्या पिशवीवर 'आर' असे लिहिले होते. असा धक्कादायक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र काल धुळे जिल्ह्यात चांगलेच चर्चेचा विषय बनले होते. पत्राची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली. या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचे एक नवीन प्रकरण उघडकीस आले. पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हे प्रकरण दडपण्यासाठी आटापिटा करीत असल्याची टीका करण्यात आली.या प्रकरणात सबंध शासन आणि पोलिस यंत्रणा हे प्रकरण दडपण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागल्याचा आरोप होत आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणात फक्त किरकोळ अदखलपात्र नोंद करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते.या प्रकरणाचा तपास लक्षात घेता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बरखास्त करण्यात यावा. विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा. आमदार खोतकर यांचे स्वीय सहाय्यक अनिल पाटील यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात यावा. अशी उपरोधिक टीका देखील खासदार राऊत यांनी केली आहे.धुळे जिल्ह्यातील यंत्रणांमार्फत विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आणि आमदारांना हा निधी देण्यात येणार होता हे स्वच्छ आहे. यासाठी शासकीय यंत्रणा राबली. त्यांना पंधरा कोटी रुपयांचे टार्गेट होते. यातील दहा कोटी रुपये आधीच जालना येथे पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहे. आमदार खोतकर यांनी मात्र या प्रकरणात कोणताही खुलासा केलेलं नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.