Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक ! 'माेठ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर'; अधिकाऱ्यांचे हुबेहुब चेहरे बनवून 'फेस स्वॅप' ॲपद्वारे लूट

धक्कादायक ! 'माेठ्या आयपीएस अधिकाऱ्याच्या नावाचा वापर'; अधिकाऱ्यांचे हुबेहुब चेहरे बनवून 'फेस स्वॅप' ॲपद्वारे लूट
 

कोल्हापूर : 'मी विश्वास नांगरे - पाटील बोलतोय, आमच्या सीनिअर अधिकाऱ्याला सहकार्य का करीत नाही?' असे बोलणारी व्यक्ती आयपीएस अधिकारी नांगरे - पाटीलच असल्याचा दत्तात्रय पाडेकरांचा समज झाला. अधिकाऱ्याचा हुबेहूब चेहरा व आवाजाचा वापर करून 'फेस स्वॅप' या ए.आय. ॲपच्या मदतीने सायबर गुन्हेगारांनी पाडेकर यांची फसवणूक केल्याचे तपासात समोर येत आहे. डिजिटल अरेस्टचा जिल्ह्यात तिसरा प्रकार घडला असून यामध्ये वयोवृद्धांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे.

दत्तात्रय पाडेकर हे अत्यंत हुशार व कष्टाळू अभियंता म्हणून रिलायन्स रिफायनरीच्या सर्वच प्रकल्पांत सहभागी असायचे. वयाच्या पासष्टीमध्येही त्यांनी कंपनीतील कामात आपली चुणूक दाखवली होती. शेअर्सबाबतही त्यांची दूरदृष्टी होती. त्यांनी पूर्वीपासून अनेक कंपन्यांचे शेअर्स घेऊन उत्तम गुंतवणूक केली होती. मात्र, एका 'ए.आय. ॲप' गैरवापराला बळी पडून आयुष्याची कमाई गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली.

आयपीएस अधिकाऱ्याच्या नावामुळे फसगत...
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे - पाटील यांचा जनमानसावर मोठा प्रभाव आहे. जिल्हा पातळीवर काम करताना त्यांनी जनता दरबारसारख्या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला होता. त्यांच्याच चेहऱ्याचा व आवाजाचा वापर 'फेस स्वॅप' ॲपवर करून तंत्रज्ञानाच्या मदतीने पाडेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. यामुळेच ते कदाचित फसवणुकीला बळी पडले असावेत.

सेबी, रिझर्व्ह बॅंक, ईडीच्या नोटिशींचा भडीमार
 
'तुमचे पैसे अधिकृत आहेत, तुमची चौकशी झाली की सर्व पैसे परत देऊ' असे रिझर्व्ह बॅंकेचे पत्र पाडेकर यांना २५ मे रोजी पाठविण्यात आले. तर 'तुम्ही तुमच्या नावावर असलेले सर्व शेअर्स विका' अशी नोटीस सेबीच्या नावाचा गैरवापर करून पाडेकर यांच्या व्हॉटस् ॲपवर पाठवली. या दोन्ही पत्रांसोबत ईडीच्या नावानेही नोटीस आल्याने पाडेकर बुचकळ्यात पडले.

वयोवृद्ध लक्ष्य...
जिल्ह्यात डिजिटल अरेस्टचा तिसरा प्रकार उघडकीस आला. दहशतवादी संघटनेला पैसे पाठविल्याचा आरोप करून उदय दुधाणे यांची ८६ लाखांची लुबाडणूक करण्यात आली होती. तर सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना तीन कोटी ५७ लाखांचा गंडा घालण्यात आला. तर आता पाडेकर यांच्यासोबतही असा प्रकार घडला. वयाची सत्तरी पार केलेल्या या तिघांची लुबाडणूक झाली असून वयोवृद्धांना लक्ष्य केले जात आहे.
'फेस स्वॅप' ॲपचा गैरवापर

फेस स्वॅप ॲप चेहऱ्यांचे फोटो किंवा व्हिडिओमध्ये बदल करण्यासाठी वापरतात. चेहरे वापरून, खोटे किंवा बदनामीकारक व्हिडिओ, फोटो तयार केले जात आहेत. लोकांना धमकावण्यासाठी, भीती घालण्यासाठी कोणाच्याही चेहऱ्याचा वापर केला जातो आहे. राजकीय नेते, प्रसिद्ध व्यक्तींविरुद्ध खोट्या बातम्या, माहिती पसरवण्यासाठी गेल्या काही दिवसांत याचा वापर वाढल्याचे दिसून येते.

जागरुकता गरजेची...
'फेस स्वॅप' ॲपच्या गैरवापराबाबत जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारांकडून 'डिजिटल अरेस्ट'सारख्या गुन्ह्यात याचा वापर झाल्याची गंभीर बाब समोर आल्याने कायदे कडक होणे आवश्यक आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.