Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकाच वेळी 5 नोकऱ्या, रोज 2.5 लाख कमाई, कोण आहे सोहम पारेख? ज्यानं उडवलीय भारत ते अमेरिका खळबळ!

एकाच वेळी 5 नोकऱ्या, रोज 2.5 लाख कमाई, कोण आहे सोहम पारेख? ज्यानं उडवलीय भारत ते अमेरिका खळबळ!



सोहम पारेख नावाचा एक भारतीय इंजिनियर आणि कन्सल्टंट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. आपल्यापैकी अनेकांना एक नोकरी आणि त्यामधील जबाबदारी पूर्ण करताना बरीच कसरत करावी लागते.

पण, सोहम एकाच वेळी 3-4 स्टार्टअप्समध्ये काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर तो दररोज 2.5 लाख रुपये यामधून कमावतोय, अशीही माहिती आहे. पण, त्याच्या या यशाची कहाणी यशाची ही कहाणी जितकी धक्कादायक आहे, तितकीच ती वादग्रस्तही आहे. याच कारणामुळे सोहम सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपिक बनला असून त्याच्यावर अनेक मीम्स तयार केले जात आहेत.

काय आहे प्रकरण?

सोहम पारेखनं एकाच वेळी अनेक स्टार्टअप्समध्ये काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने त्याची चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेतील एका संस्थेच्या संस्थापकाने सॉफ्टवेअर इंजिनियर सोहम पारेखवर अनेक स्टार्टअप्समध्ये 'मूनलाइटिंग' (एकाच वेळी दोन ठिकाणी काम करणे) करत असल्याचा आणि तसं उघडकीस आणल्यावरही ते सुरूच ठेवल्याचा आरोप केला आहे.


मिक्सपॅनेलचे संस्थापक सुहैल दोशी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर सोहम पारेखबद्दल इतर उद्योजकांना सार्वजनिकपणे इशारा दिल्याने या वादाला तोंड फुटले. दोशी यांनी आरोप केला की सोहमने मिक्सपॅनेलमध्ये थोड्या काळासाठी काम केले होते आणि नंतर त्याला काढून टाकण्यात आले. सोहम YC कंपन्यांचा (वाय कॉम्बिनेटर, एक प्रमुख स्टार्टअप इनक्यूबेटर) गैरफायदा घेत असल्याचा दावाही त्यांनी केला.

दोशी यांनी सोहमचा सीव्ही (बायोडाटा) देखील शेअर केला, त्याच्या पोर्टफोलिओच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर त्यामधील केलेले 90 टक्के दावे खोटे असल्याचा आरोप केला. सिलिकॉन व्हॅलीमधील इतर अनेक संस्थापक, इंजिनियर्स आणि भरती व्यवस्थापकांनीही सोहम पारेखवर वैयक्तिक फायद्यासाठी नोकरीच्या संधींचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.


या बातमीने सिलिकॉन व्हॅली आणि भारतातील इंजिनिअर्समध्ये खळबळ उडाली आहे. हा अलीकडील काळातील सर्वात धक्कादायक रोजगार घोटाळा असल्याचा दावा काही जणांनी केलाय. तर त्याचवेळी या विषयावर ट्विटरवर मीम्सचा पाऊसही पडला आहे.

कोण आहे सोहम पारेख?

सोहम पारेख एक भारतीय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ज्याने कोणतीही माहिती न देता एकाच वेळी अनेक स्टार्टअप्समध्ये काम केले, याला 'मूनलाइटिंग' असे म्हणतात. तो मुलाखतीमध्ये अत्यंत कुशल आणि प्रभावी असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर त्यानं एकाचवेळी अनेक ठिकाणी काम करत मालकांची फसवणूरक केल्याचा आरोप आहे. यामुळे रिमोर्ट वर्क, भरती प्रक्रिया आणि तंत्रज्ञान उद्योगातील नैतिकतेवर चर्चा सुरु झाली आहे.

सोहमनं मुंबई विद्यापीठातून मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी (2020), आणि जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स (2022) केल्याचं सांगितलं जात आहे.

व्यावसायिक अनुभव

सोहमच्या कथित रेझ्युमेमध्ये अनेक तंत्रज्ञान स्टार्टअप्समध्ये त्यानं केलेल्या कामांची यादी दिली आहे.
डायनॅमो एआय (जानेवारी 2024 पासून कार्यरत) वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनियर (कंत्राट).
युनियन.एआय (जानेवारी 2023-जानेवारी 2024) येथे वरिष्ठ फुलस्टॅक इंजिनियर.
सिंथेसिया (डिसेंबर 2021-डिसेंबर 2022) येथे वरिष्ठ फुलस्टॅक इंजिनियर.
ॲलन एआय (जानेवारी 2021-डिसेंबर 2021) येथे संस्थापक सॉफ्टवेअर इंजिनियर.
गिटहब (मे 2020-ऑगस्ट 2020) येथे ओपन सोर्स फेलो.
त्याचबरोबर सोहम पारेखनं काम केलेल्या इतर कंपन्यांमध्ये अँटीमेटल, फ्लीट एआय आणि मोझॅक यांचा समावेश आहे. मॅथ्यू पार्खर्स्ट (अँटीमेटलचे सीईओ) आणि मिशेल लिम (वॉरपच्या उत्पादन प्रमुख) यांच्यासह अनेक स्टार्टअप संस्थापकांनी सोहमला कामावर घेतल्याचं मान्य केलं. त्याचबरोबर त्याच्या कामाचा कालावधीही कमी केला आहे.


सोहम हा एक हुशार इंजिनिअर असल्याचं त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. एखादं काम करण्यास इतरांना तीन तास लागत असतील तर तो ती कामं एका तासामध्ये पूर्ण करु शकतो, असं सांगितलं जातं. तो मुलाखतीमध्येही उत्तम कामगिरी करत असे. तसंच त्याच्याकडं उत्तम तांत्रिक कौशल्य असल्यानं स्टार्टअप्स त्याला नोकरीसाठी पसंती देत.

पण, त्याच्यावरील आरोपांनुसार त्यानं या हुशारीचा गैरफायदा घेतला. एकाचवेळी अनेक पूर्णवेळ कामं स्विकारली. काही कामं कनिष्ठ सहकाऱ्यांवर सोपवले तसंच कामाच्या प्रेशरमुळे ते करण्यात तो अपयशी ठरला.

दरम्यान सोहम पारेखनं त्याच्यावरील कोणत्याही आरोपांवर अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.