राज्यात महायुतीचे सरकार येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गास मंजुरी दिली आहे. आता मोजणीला देखील वेग आला असून थेट पोलिस बंदोबस्त लावण्यात येत आहे. यामुळे राज्यभरातील विविध जिल्ह्यात शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. दरम्यान कोल्हापुरात या विरोधात मोठा रास्ता रोको करण्यात आला ज्यात शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टींसह विविध नेते सहभागी झाले होते. यावेळी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटीलही या आंदोलनात सांगली येथे सहभाग घेतला. हा सहभाग आता विशाल पाटील यांना भोवला असून त्यांच्यासह 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
शक्तीपीठ रेटण्याचा प्रकार राज्य सरकारकडून केला जात असून अनेक जिल्ह्यात पोलिसबंदोबस्तात मोजणी केली जातेय. पण शेतकरी त्यास विरोध करत असून अधिकाऱ्यांना अडवले जात आहे. यावरून पोलिस शेतकरी असा संघर्ष होताना दिसत आहे. या मोजणीविरोधात शेट्टी यांनीही आक्रमक पवित्रा घेत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशीच भूमिका घेतली आहे. त्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी (ता.1) रास्ता रोको करण्यात आला.यावेळी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेतली. त्यांनी शक्तिपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर अंकली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे त्यांच्यासह 50 जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विशाल पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी करत आंदोलन केल्याने सांगली ते कोल्हापूर महामार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला होता.
राजू शेट्टी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांनी 20 जून रोजी बंदी आदेश लागू केला होता. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत विशाल पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून तासभर वाहतूक रोखली होती. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत सांगली ग्रामीण पोलिसांनी खासदार विशाल पाटील यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचाही समावेश आहे.
दरम्यान बंदी आदेशाचे उल्लंघन कोल्हापुरातही करण्यात आल्याने राजू शेट्टींसह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांचा देखील समावेश आहे. शेट्टी यांचे हे आंदोलन येथील पंचगंगा नदीवरील पुलावर करण्यात आले. यावेळी काही शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करत नदीत उड्या घेण्याचा प्रयत्न केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.