मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी होणार असल्याची माहिती दिली आहे. सध्या महाराष्ट्राचा दर प्रतियुनिट ८.३२ रुपये आहे, जो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर येईल. तसेच 'टेरिफ ट्रू-अप' प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे फडणवीसांनी केलेली ही घोषणा दिलासादायक ठरली आहे.
काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देत असतांना फडणवीसांनी सांगितले की, राज्य सरकार वीज ‘मेरिट ऑर्डर डिस्पॅच’ प्रणालीद्वारे खरेदी करणार आहे. यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दराने वीज खरेदी करता येईल. सौर आणि पवन ऊर्जा, तसेच बॅटरी स्टोरेजचा वाढता वापर पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करत आहे. परिणामी, वीजदरात स्थैर्य येणार असून पुढील २५ वर्षांसाठी दर स्थिर राहतील, असेही त्यांनी सांगितले.
ग्राहकांना २६ टक्के दरसवलत मिळणार
पुढे फडणवीस म्हणाले की, व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सर्वच स्तरांवरील वीज दरात कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यातील ७० टक्क्यांहून अधिक ग्राहक दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात. या ग्राहकांना २६ टक्के दरसवलत मिळणार असून, जास्त वापर करणाऱ्या ग्राहकांनासुद्धा दिलासा मिळेल.तसेच, उपसा सिंचन प्रकल्पांसाठी स्वतंत्र सौरऊर्जा प्रस्ताव तयार असून, त्याचा वापर मुख्यतः अंधार असलेल्या भागात केला जाणार आहे. कृषी क्षेत्रातील वीज वापर स्मार्ट मीटर लावल्याने शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते, हे समजणे शक्य होणार आहे. याशिवाय वीज चोरी आणि गैरवापर रोखण्यासाठी स्मार्ट मीटर बसवल्याने भविष्यातील वीज नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.