Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदाराचे गंभीर आरोप; मोदी-शाहांबद्दल नेमकं काय म्हणाले?

भाजपाला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदाराचे गंभीर आरोप; मोदी-शाहांबद्दल नेमकं काय म्हणाले?
 

धार्मिक वादग्रस्त विधाने करून हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडणारे आमदार टी राजा सिंह यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. रामचंद्र राव यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ३० जून रोजी त्यांनी पक्षाच्या प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. टी राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. अत्यंत कमी वेळात त्यांनी पक्षाचे फायरब्रँड नेते म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, आता भाजपातून बाहेर पडल्यानंतर त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. कारण- पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यास गोशामहल मतदारसंघाची जागा रिकामी होऊन तिथे पोटनिवडणूक लागू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर टी राजा सिंह यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपाच्या राज्य नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपातून बाहेर पडल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना आपला पाठिंबा असल्याचं टी राजा सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षात जाण्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पक्षाच्या काही राज्यस्तरीय नेत्यांमुळेच मी प्राथामिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, असं टी राजा यांनी म्हटलं आहे. भाजपामधून बाहेर पडलो असलो तरीही आपण हिंदुत्वाच्या विचारांशी कुठलीही तडजोड केली नाही, असंही ते म्हणाले आहेत.

प्रश्न : ११ जुलै रोजी भाजपाने तुमचा राजीनामा स्वीकारल्यामुळे तुमची निराशा झाली का?

आमदार टी राजा सिंह म्हणाले, “२०१४ मध्ये मी पहिल्यांदा भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर गोशामहल विधानसभा मतदारसंघातून मी तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलो. यादरम्यान, पक्षाला बळकटी मिळावी यासाठी कामही केले आणि तुरुंगातही गेलो. राज्यात भाजपाने सत्तास्थापन करावी, असं तेलंगणातील लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, पक्षाने माझा राजीनामा स्वीकारल्यामुळे त्यांचं मनोबल खचलं आहे.”
 

 
 

प्रश्न : एन. रामचंद्र राव यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही तडकाफडकी राजीनामा का दिला?
आमदार टी राजा म्हणाले, “माझा रामचंद्र राव यांच्याशी काही वैयक्तिक वाद नाही. ते एक चांगले वकील आहेत; पण न्यायालयात लढण्याची कला वेगळी असते आणि काँग्रेस, बीआरएस व एआयएमआयएमविरुद्ध लढण्यासाठी वेगळे कौशल्य लागते. मला वाटतं की, पक्षाने त्यांच्याजागी एखाद्या खासदार किंवा आमदाराची प्रदेशाध्यपदी नियुक्ती केली असती तर ते अधिक योग्य ठरलं असतं.”
प्रश्न : तुमचे मत पक्षाकडून गांभीर्याने घेतले गेले नाही का?

या प्रश्नावर उत्तर देताना टी राजा सिंह म्हणाले, “होय… भाजपामध्ये दोन-तीन नेते असे आहेत, ज्यांना पक्षाला राज्यात सत्तेवर येऊ द्यायचं नाही. शेवटी भाजपाच्या नेतृत्वानेही त्यांचचं म्हणणं ऐकलं आहे.” दरम्यान, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर टी राजा हे दुसऱ्या पक्षात तुम्ही दुसऱ्या पक्षात जाणार आहात का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, “नाही… ९९% मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. माझी विचारसरणी हिंदुत्व आहे आणि त्यामुळेच काँग्रेस किंवा बीआरएसच्या नेत्यांबरोबरचे माझे मत जुळत नाही. एआयएमआयएमबद्दल तर बोलायलाही नको. मी आणि माझे समर्थक पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विचारांचा प्रसार करत राहणार, असं टी राजा सिंह यांनी स्पष्ट केलं. टी राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल विधानसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत.
 
प्रश्न : आता तुम्ही अपक्ष आमदार म्हणून काम करणार का?
“होय… आता मी अपक्ष आमदार म्हणून काम करीत राहणार आहे; पण भाजपाच्या विचारसरणीला बाहेरून पाठिंबा देत राहीन आणि हिंदुत्वासाठी कार्य सुरू ठेवेन. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मला खूप दुःख झालं आहे. असं वाटतंय की, मी माझ्या कुटुंबापासून दूर झालोय; पण आता काहीच करता येणार नाही. कारण केंद्रीय नेतृत्वाला राज्यातील घडामोडींची पूर्ण कल्पना नाही,” अशी खंत आमदार टी राजा सिंह यांनी यावेळी बोलून दाखवली. इतकंच नाही तर केंद्रीय नेतृत्वाने टेलिजन्स ब्युरोकडून एक अहवाल मागवावा, ज्यातून भाजपाचे राज्यातील आपलं कसं आणि किती नुकसान करीत आहेत हे त्यांच्या (पंतप्रधान मोदी व अमित शाह ) लक्षात येईल, असंही ते म्हणाले.
प्रश्न: तुमच्या भाषणांमुळे आणि पोलीस खटल्यांमुळे भाजपाने तुम्हाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला का?

या प्रश्नाला उत्तर देताना टी राजा सिंह म्हणाले, “माझी भाषणे फक्त हिंदुत्वासाठी असतात. केवळ हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांचा मी समाचार घेतो. हैदराबादमध्ये आम्ही एआयएमआयएमच्या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. काही लोकांना सौम्य भाषण करणारे नेते हवे असतात; पण माझी शैली स्पष्ट आणि ठाम आहे. त्यामुळेच आजही भाजपाचे अनेक कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत. मात्र, असं असलं तरी मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. कारण इतरांकडे हिंदुत्वाची विचारसरणी नाही. अयोध्येतील राममंदिर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळेच बांधणं शक्य झालं.”

प्रश्न: तुम्ही आमदारकीचा राजीनामा द्याल का?
केंद्रीय नेतृत्वाने सांगितले तर मी नक्कीच आमदारकीचा राजीनामा देईल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखं काम करेन, असंही टी राजा यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आमदार टी राजा यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्ये केल्याप्रकरणी ७० हून अधिक तक्रारी दाखल आहेत. २०२२ मध्ये मोहम्मद पैंगबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर भाजपाने टी राजा यांना नोटीस पाठवून त्यांचं तडकाफडकी निलंबन केलं होतं. विशेष बाब म्हणजे, यापूर्वी २०१८ मध्येही टी राजा यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता; पण पक्षाने तो स्वीकाराला नव्हता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी आमदार टी राजा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी राज्यात त्यांनी अनेक सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी अनेकदा मुस्लीमविरोधी प्रक्षोभक भाषणे केल्याचं दिसून आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.