Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रस्त्यावर गाड्यांची वर्दळ अन् मधोमध कोसळलं विमान; झाला भीषण स्फोट; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल: व्हिडिओ पहा

रस्त्यावर गाड्यांची वर्दळ अन् मधोमध कोसळलं विमान; झाला भीषण स्फोट; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल: व्हिडिओ पहा
 

उत्तर इटलीमधील ब्रेशिया शहराजवळ मंगळवारी घडलेल्या एका भयानक विमान दुर्घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. वर्दळीच्या महामार्गावर एक छोटं अल्ट्रालाइट विमान कोसळलं आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी भीषण होती की परिसरात काही क्षणातच धमाका झाला, आगीचे लोट आणि काळ्या धुराचे लोट उठले. या थरारक दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मृतांमध्ये मिलान येथील 75 वर्षीय अनुभवी वकील आणि पायलट सर्जियो रवाग्लिया यांचा समावेश असून, त्यांच्या सोबत प्रवास करत असलेल्या 60 वर्षीय अॅन मारिया डी स्टेफानो यांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघं अल्ट्रालाइट "फ्रेसिया आरजी" या इटालियन बनावटीच्या विमानातून प्रवास करत होते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगसाठी महामार्ग निवडला होता. मात्र विमानावरचा ताबा सुटल्याने ते थेट रस्त्यावर कोसळले आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला.
 


व्हिडिओमध्ये दिसतं की विमान प्रचंड वेगात खाली येतं आणि रस्त्याला धडकताच मोठा स्फोट होतो. या स्फोटात विमान पूर्णपणे जळून खाक झालं. हे विमान कार्बन फायबरपासून बनवलेलं असून त्याचे विंग सुमारे 30 फूट लांब होते. आगीने विमानाची अक्षरशः राख केली. या दुर्घटनेदरम्यान महामार्गावरून जात असलेले दोन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. मात्र त्यांचा जीव थोडक्यात वाचला, ही बाब सुदैवाची म्हणावी लागेल. सुदैवाने विमान इतर कोणत्याही वाहनावर कोसळले नाही, अन्यथा मृतांचा आकडा आणखी वाढला असता. अपघातानंतर काही मिनिटांतच आपत्कालीन सेवा रस्त्यावर दाखल झाली. मात्र स्फोट इतका तीव्र होता की काहीही कळण्यास वेळ मिळाला नाही.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी इटलीची नॅशनल एजंसी फॉर फ्लाइट सेफ्टीने एक तज्ञ पथक ब्रेशिया येथे पाठवले आहे. त्याचबरोबर ब्रेशिया प्रॉसिक्यूटर्स ऑफिसनेही यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. ही दुर्घटना अत्यंत धक्कादायक असून विमान प्रवासातील सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत तांत्रिक अडचणींवर नियंत्रण ठेवणे किती अवघड असते, याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. सध्या संपूर्ण इटलीमध्ये या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.