राज्यात यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते एकत्र येणार अशी चर्चा आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंनाच सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे. 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले चव्हाण?
अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रहितचीा विचार करत कुणी आमच्यासोबत येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ असं मोठं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आमचे विचार सोडले. ते आता जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत वेगळी भूमिका घेत आहेत. जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हंटलं पाहिजे. पण ते विरोधासाठी विरोध करत आहेत, अशी टीकाही चव्हाण याांनी उद्धव ठाकरेंवर केली.उद्धव ठाकरे यांनी त्यांची आधीची भाषा बदलली. आम्ही आमची भाषा आणि लाईन कधीच बदलली नाही. कुठेतरी इगो बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे यांनी जायला हवं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दोन ठाकरे एकत्र येतील की नाही हे तेच ठरवतील. आम्ही आमचं संघटन वाढवू, ताकद वाढवू असं चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.
'म मराठीचा नाही म मतांचा'
ठाकरे हे म मराठीचा विचार न करता म मतांचा विचार करतात. मराठीच राजकारण ठाकरे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच करतात, असंही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही विकास कामांच्या जोरावरच लोकांकडे मतं मागणार असल्याचं चव्हाण यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होणार का? याबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री घेतील. 2017 ला आम्ही मुंबई महापालिकेचं महापौरपद शिवसेनेला दिलं होतं त्यावेळेस काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे, याची आठवणंही त्यांनी करुन दिली. भाजपा पुढील काळात आणखी बळकट होईल. आम्ही त्या नेत्यांना पक्षात घेतलं नाही तर ते इतर पक्षात जातील. त्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान होईल त्यामुळे अनेकांना प्रवेश दिला जातो, असं चव्हाण यांनी पक्षातील इनकमिंगबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.