हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात नारा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जय गुजरात म्हटल्याने मराठी अस्मिताचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हिंदीसोबत आता गुजराती शिकायला सुरुवात करायची का, असं म्हणत विरोधकांनी टीकेचे बाण एकनाथ शिंदेंना मारले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसे राहू शकतात? असा सवालच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर जय गुजरातची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात घोषणेवरून शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणेबाबत अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र, जय गुजरात नारा दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'एक्स'वर पोस्ट करत एकनाथ शिंदे यांचा तिखट भाषेत समाचार घेतला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं की, 'अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा यांच्या समोर 'जय गुजरात' ची गर्जना केली. काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.