आकाशवाणी आमदार निवासातील कँटीनमध्ये मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. शिळ्या आणि वास येणाऱ्या जेवणाच्या कारणावरुन आमदार संजय गायकवाड यांनी कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
शिळ्या जेवणावरुन संताप
संजय गायकवाड यांनी कँन्टीनमध्ये दिल्या गाणाऱ्या जेवणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांचा आरोप आहे की, कँन्टीनमध्ये दिली गेलेली डाळ शिळी आणि वास येणारी होती. याबाबत कँन्टीन व्यवस्थापकाशी त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरत कठोर शब्दांत सुनावले.
आमदार निवासात खळबळ
आमदार निवासासारख्या उच्चस्तरीय ठिकाणी अशी घटना घडल्याने कर्मचारी आणि इतर आमदारांमध्येही अस्वस्थता पसरली आहे. कँन्टीन कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची माहिती आकाशवाणी आमदार निवास प्रशासनाला देण्यात आली असून, तपास सुरू आहे.
सभागृहात मुद्दा उपस्थित करणार
संजय गायकवाड यांनी या घटनेची दखल घेत सभागृहात हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. कँन्टीनमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत ते प्रशासनाला जाब विचारणार आहेत. यामुळे विधानसभेतही या प्रकरणावरुन गोंधळ होण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या आक्रमक वक्तव्यांनी आणि कृतींनी लक्ष वेधले आहे.
वादग्रस्त आमदाराची ओळख
संजय गायकवाड हे महाराष्ट्रातील वादग्रस्त आमदारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्या वक्तव्यांनी आणि कृतींनी राजकीय वर्तुळात वाद निर्माण केले आहेत. आता आमदार निवासातील या मारहाणीच्या घटनेमुळे त्यांच्यावरील टीका अधिक तीव्र झाली आहे. सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी गायकवाड यांच्या वर्तनाचा निषेध केला आहे, तर काहींनी कँन्टीनमधील जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.