राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चाचपणी करीत आहे. यामध्ये त्यांनी एक नवा डाव टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रत्येकाची भावना असल्याचा दावा त्यांनी केला.
उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आणि ताकद वाढते आहे. त्यात महायुतीच्या सहकारी पक्षांची कोंडी आणि संकोच होताना दिसतो. अशातच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष करीत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जळगाव येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती बरोबरच लढण्याचे संकेत त्यांनी दिले. पक्षाला येत्या निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आक्रमक भाषण केले. पक्षाचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची क्षमता आहे. कार्यकर्त्यांसह प्रत्येकाला अजित पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असे वाटते. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्याची गरज असल्याचे, ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. पक्षाचे संख्याबळ विचारात घेता अजित पवार स्वबळावर मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आपल्याला महायुतीतच राहून राजकारण करावे लागेल. मात्र अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना भारतीय जनता पक्षाला कळविण्यात येईल, असे तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि अजित पवार पक्षाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया आगामी काळात होणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. असे कोणतेही प्रस्ताव पक्षाकडे नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय विचारपूर्वक केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०१४ आणि २०१५ मध्ये भाजपा बरोबर जाण्याची चर्चा चार ते पाच वेळा झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी तो निर्णय लांबणीवर पडायचा, असा दावा तटकरे यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष तटकरे सध्या जळगाव येथून उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकींचा श्री गणेशा करीत आहेत. गुरुवारी त्यांनी जळगाव येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर युवा शाखेचे अध्यक्ष सुरज चव्हाण माजी खासदार आनंद परांजपे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.