धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप? पडळकर बंधूंच्या कॉल डिटेल्सची शिवसेनेकडून मागणी
सांगली जिल्हा सुन्न करणारी घटना काहीच दिवसांपूर्वी घडली होती. जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका गावात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. तिने गावातील चार तरूणांच्या मानसिक आणि शारीरीक त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले होते. या चार पैकी एकाने तिचा बलात्कार केला होता. तसेच त्या घटनेचा व्हिडिओ तयार केला होता. त्याचाच वापर करून तिला सतत त्रास दिला जात होता. आता या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली असून हे प्रकरण दाबण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात तपास होण्यासाठी भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता केली जातेय. याबाबत आटपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नव्हती. उलट ग्रामस्थांनी चार पैकी दोघांना पकडले होते. त्यातील एकाला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर पोलिसांकडे दिले होते. पण संध्याकाळपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. पोलिसांनी आत्महत्याचे कारण नोंद केले होते. पण पिडितेचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रात्री 11 पर्यंत पोलिस स्टेशनच्या दारात मृतदेहासह ठिय्या मारल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबावाचा वास अनेकांना येत होता.
आतातर शिवसेनेनंच याबाबत संशय व्यक्त केला असून थेट पडळकर बंधुंकडे बोट दाखवले आहे. तसेच यांचे यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाने मागवावेत, अशी मागणी केली आहे. याबाबतचे आटपाडी पोलिसांना शिवसेनेचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी निवेदन दिले आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात, आटपाडी तालुक्यातील एका गावातील दहावीमध्ये शिक्षणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. यामागे काही तरुणांचा सातत्याने होणारा त्रास, लैंगिक अत्याचार, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमकी कारणीभूत आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून ती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांत चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर याबाबत अधिवेशनात देखील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी आवाज उठवला होता. त्यांनी पिडित मुलीला व तिच्या नातेवाइकांना न्याय देण्यासह दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती. तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा दावा केला होता. तर याची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी केली होती.त्यामुळे आता या घटनेत कोणाचा हस्तक्षेप का? हे उजेडात आणण्यासाठी पोलिस निरीक्षकांचे आधी कॉल डिटेल्स काढावेत. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता काय? हे समोर येईल. तसेच अधिक तपास करण्यासाठी गृहविभागाने व पोलिस प्रशासनाने आमदार गोपीचंद पडळकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे या घटनेच्या कालावधीतील कॉल डिटेल्स तपासावेत, अशीही मागणी या निवेदनातून केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.