Breaking News ! आता विद्यार्थी अन् प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी
बंधनकारक; वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशिन; परीक्षेसाठी ७५ टक्के
उपस्थिती आवश्यक
सोलापूर : उच्च महाविद्यालयांमधील अध्यापन गुणवत्तापूर्ण व्हावे, नियमित सर्व विषयांच्या तासिका व्हाव्यात, विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहावी, अशा उद्देशाने विद्यापीठाशी संलग्नित सर्व उच्च महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांना आजपासून ता. (१५) बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यासंबंधीचा पत्रव्यवहार सर्व विद्यापीठांना केला होता. त्यानुसार आता ही कार्यवाही होणार आहे.
इयत्ता बारावीनंतर किंवा पदवीनंतरचे अनेक विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येतात, पण वर्गात बसतच नाहीत. दुसरीकडे अनेक विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासला जातात आणि त्यामुळे ते महाविद्यालयांमधील लेक्चरसाठी बसत नाहीत, अशी सद्य:स्थिती आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांसह संलग्नित महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे, पण अनेक विद्यार्थ्यांना त्याबद्दल फारशी माहिती नाही, ही वस्तुस्थिती आहे.दर्जेदार अध्यापन होण्यासाठी वर्गातील विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थी वर्गामध्ये जाताना त्यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे. तो नियम प्राध्यापकांसाठी देखील लागू असणार आहे. दरम्यान, विद्यापीठातील सर्व संकुलांमध्ये देखील या नियमाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.
संवैधानिक अधिकारी भेटी देऊन मशीन बसविल्याची पहाणी करतील
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाशी संलग्नित ११५ उच्च महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यासंबंधी कळविले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सर्व महाविद्यालयांनी बायोमेट्रिक हजेरीची १५ जुलैपासून कार्यवाही करणे अपेक्षित आहे. कुलगुरूंसह आम्ही सर्व संवैधानिक अधिकारी संलग्नित महाविद्यालयांना भेटी देऊन नव्या प्रणालीची पहाणी केली जाईल. ज्यांना अडचणी आहेत, त्या सोडविल्या जातील.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची स्थिती
एकूण महाविद्यालये
११५
अंदाजे विद्यार्थी संख्या
५५,०००
बायोमेट्रिक हजेरीचे बंधन
१५ जुलैपासून
परीक्षेसाठी ७५ टक्के हजेरीचे बंधन
विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी प्रत्येक सत्रात किमान ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक असते. विद्यापीठाच्या दोन सत्र परीक्षेत ९० दिवसांचे अंतर असते. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्याची वर्गातील हजेरी ९० पैकी ७० दिवस तरी असणे आवश्यक असणार आहे. परीक्षेचा अर्ज भरताना ही अट लागू असेल. ७५ टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असलेल्या विद्यार्थ्याला अनुपस्थित का राहिला, याची पुराव्यानिशी ठोस कारण द्यावे लागणार आहे. त्यासाठी पण विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागेल हे निश्चित.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.