मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे वेगाने घडामोडी घडत आहेत, ज्या आगामी काळातील मोठ्या राजकीय उलथापालथीची नांदी ठरत आहेत. एकाच दिवशी घडलेल्या दोन महत्त्वाच्या घटनांनी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्लीसाठी रवाना झाले, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काही मोठे बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्याच वेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. फडणवीस यांनी राज्यपालांसोबत विविध विषयांवर चर्चा केल्याचे समजते. या दोन्ही घटनांच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामागे काय?
दिल्लीत दाखल झालेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या खासदारांसोबत एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करणार आहेत. याचसोबत, ते सर्व राज्यांमधील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, शिंदे आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान कायदेशीर तज्ज्ञांशी (वकिलांशी) देखील चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून कायदेशीर तयारी केली जात असावी, असा कयास लावला जात आहे. शिंदे आपल्या खासदारांसोबत संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मांडायच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच, अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व खासदार एकत्र असल्याने, पक्षाशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आणि महायुतीमधील अंतर्गत खटके
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्षश्रेष्ठींशी मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांना बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत चर्चा केली होती, अशी माहिती आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे आगामी काळात यावर काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आगामी निवडणुकीत मोठी रंगत येणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले, तर महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते आणि निवडणुकीत मोठी रंगत येईल. सध्या महायुतीमध्ये अंतर्गत खटके उडत असल्याचीही चर्चा आहे. एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले अनेक निर्णय फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवल्याची चर्चा आहे. तसेच, फडणवीसांच्या नगरविकास खात्यातून मंजूर होणारा निधी अंतिम स्वाक्षरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे येईल, असा निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणत्या दिशेने घेऊन जातात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.