Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"४०,००० रुपयांचं चिकन सॅलड बनवण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन हवी" बॉलीवूडकरांच्या अजब मागण्या; फराह खानने केली पोलखोल

"४०,००० रुपयांचं चिकन सॅलड बनवण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन हवी" बॉलीवूडकरांच्या अजब मागण्या; फराह खानने केली पोलखोल

ज्येष्ठ अभिनेते व चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी १९८७ मध्ये दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं खुदगर्ज. यानंतर ‘खून भरी मांग’, ‘काला बाजार’, ‘कोयला’ यांसारख्या अनेक सिनेमांची त्यांनी निर्मिती केली.

मात्र, २००० मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘कहो ना प्यार है’ सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. राकेश रोशन यांनी या चित्रपटातून त्यांचा मुलगा आणि सध्याचा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला लॉन्च केलं होतं. या सिनेमाच्या निमित्ताने राकेश रोशन आणि कोरिओग्राफर फराह खान यांनी एकत्र काम केलं होतं. अर्थातच, या सिनेमातील सगळी गाणी आणि डान्स स्टेप्स सुपरहिट ठरल्या होत्या.

राकेश रोशन आणि फराह खान आता पुन्हा एकदा एकत्र आले होते. याचं कारण म्हणजे, फराहने नुकतीच राकेश रोशन यांच्या घरी भेट दिली होती. या दोघांनी यावेळी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत, गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीत काय-काय बदल झाले, सिनेमांचं बजेट हळुहळू कसं वाढत गेलं यावर देखील चर्चा केली.
‘कहो ना प्यार है’ सिनेमाच्या वेळी फक्त ३० ते ४० जणांची टीम घेऊन आपण शूटिंग पूर्ण केल्याचं यावेळी फराह खानने सांगितलं आणि राकेश रोशन यांनीही फराहशी सहमती दर्शवली. पण, आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून एकत्र २०० लोकांना घेऊन प्रवास करावा लागतो. एका अभिनेत्याबरोबर जवळपास २० लोक असतात.

राकेश रोशन यांनी या व्हिडीओमध्ये फराहशी गप्पा मारताना आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला. ते म्हणतात, “एकदा सिमी गरेवालने मला फोन केला होता. ती म्हणाली, एक सेलिब्रिटी जोडपं आहे त्यांना सेटवर ९ व्हॅनिटी व्हॅन्स हव्या आहेत.” हा खुलासा ऐकून फराह खानने सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं.

राकेश रोशन पुढे सांगतात, “९ व्हॅनिटी व्हॅन हव्यात हे ऐकून मला धक्का बसला होता. आपला मुलगा हृतिक सुद्धा अशा मागण्या करत नसेल ना अशी शंकाही आली. त्यामुळे रात्रभर झोप लागली नाही. शेवटी सकाळी मी माझ्या ड्रायव्हरला सुशीलला फोन करून विचारलं की, आपल्याकडे किती व्हॅन आहेत? यावर तो म्हणाला, ‘फक्त १ व्हॅनिटी व्हॅन आहे’ त्यावेळी मला जरा समाधान मिळालं. मला आधी इंडस्ट्री जे काही बदल झालेत त्याची एवढी कल्पना नव्हती. पण, जेव्हा २०१७ मध्ये काबिलच्या सेटवर मी व्हॅनिटी व्हॅन्सची संख्या पाहिली तेव्हा खरंच आश्चर्य वाटलं. एकूण १०-१२ व्हॅन्स उभ्या होत्या. मी सेटवर विचारलं देखील होतं, आपल्याला खरंच एवढ्या व्हॅन्सची गरज आहे का? तर ते लोक म्हणाले, “एक लाईट मास्टरसाठी, एक कॅमेरामनसाठी, एक कोरिओग्राफरसाठी, दोन हिरोसाठी, एक हिरोइनसाठी…” या व्हॅन वापरण्याइतका त्यांच्याकडे वेळ तरी असतो का? असा प्रश्न त्यावेळी मला पडला होता.”

व्हॅनिटी व्हॅनमध्ये ४० हजारांचं चिकन सॅलड बनवतात…

फराह खान म्हणते, “मी कधीच व्हॅनिटी व्हॅन मागत नाही. माझी फक्त एकच अपेक्षा असते ती म्हणजे स्वच्छ वॉशरुमची सुविधा उपलब्ध करून द्या…आपण आधी सगळेजण सेटवर एकत्र जेवायचो पण, आता परिस्थिती इतकी बदलली आहे की, अभिनेत्याच्या पर्सनल शेफसाठी वेगळी व्हॅनिटी व्हॅन द्यावी लागते. ज्यात ते लोक ४० हजारांचं चिकन सॅलड बनवतात. म्हणजे या लोकांना महागडे पदार्थ बनवण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन हव्या. बरं त्यात काहीच नसतं, फक्त उकडलेलं चिकन आणि सॅलड… एवढं सगळं करूनही शेवटी मी जे पदार्थ माझ्या घरून बनवून नेते तेच हे लोक आवडीने खातात. म्हणतात, मॅडम तुम्ही काय आणलंय? आमच्याबरोबर शेअर करा…खरंच सगळं कठीण झालंय. हे किस्से ऐकून एकच म्हणेन सर्व निर्मात्यांना माझ्या शुभेच्छा.”

“आजकाल अभिनेते सेटवर व्हॅनिटी व्हॅन येईपर्यंत शूटिंगही सुरू करत नाहीत. एका हिरोसाठी चार व्हॅन्स असतात. एक हिरोच्या जिमसाठी, एक त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी, एक व्हॅन स्वत:साठी आणि अशा बऱ्याच मागण्या केल्या जातात. आधी सगळे कलाकार तडजोड करायचे. प्रसंगी झाडांच्या आड, टॉवेल धरून कपडे देखील बदलले आहेत. पण, आताचे कलाकार व्हॅनिटी व्हॅन नसेल तर काहीच करत नाहीत.” असं फराहने सांगितलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.