कुपवाड हादरले: आठ महिन्यांत आठ खून
सांगली : जिल्ह्यामध्ये आठ महिन्यांत 46 खून झाले आहेत. यामध्ये एकट्या कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 8 खून झाले आहेत. पोलिसांचा धाक कमी असणे, तरुणांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता, अवैध व्यवसायांचा सुळसुळाट, राजकीय आश्रय या कारणांनी कुपवाडमधील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या आठ महिन्यांत झालेले खून कुपवाड शहरालगतच्या विस्तारित भागात झालेले आहेत. यापैकी एकही खून मूळ कुपवाड गावात झालेला नाही. याशिवाय एका खुनाचा अपवाद वगळता, ज्यांचे सात खून झाले आहेत ते व खून करणारे संशयित स्थानिकच आहेत. कुपवाड गावठाण हद्दीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. विस्तारित भागात नव्याने राहण्यास आलेल्या आरोपींनी केलेले खून आहेत. सुमारे 35 वर्षांपूर्वी स्वतंत्र कुपवाड पोलिस ठाण्याची स्थापना झाली. सुरुवातीला भाडोत्री जागेत पोलिस ठाणे होते. त्यानंतर स्वतंत्र व प्रशस्त जागेत पोलिस ठाणे स्थलांतर झाले. संजय मेंढे, सुनील महाडिक, अभय कुरुंदकर, डी. के. आजरी, शशिराज पाटोळे यांसारख्या पोलिस अधिकार्यांनी पोलिस ठाणे हद्दीमध्ये जरब बसवली होती. त्यांच्या काळात गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी विचार करायचा. अनेक गुन्हेगारांनी तर गुन्हेगारी कारवाया सोडल्या. तसेच काही गुन्हेगारांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीबाहेर गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्या होत्या.
पोलिसांकडून अपेक्षा
निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी देखील सुरुवातीला गुन्हेगारांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली होती. त्यांनी अनेक गुन्हेगारांची चौका-चौकात धिंड काढली होती. काहींचे चौकात नेऊन मुंडण केले होते. त्यांनी यापूर्वी अनेक महत्त्वाच्या यशस्वी कारवाया केल्या आहेत. त्यांच्याकडून कुपवाडकरांच्या अनेक अपेक्षा आहेत.
अवैध धंदे वाढले
कुपवाड हद्दीमध्ये सध्या मटका, ऑनलाईन जुगार यासारखे अवैध धंदे सुरूच आहेत. जिल्ह्यामध्ये ऑनलाईन लॉटरी बंद असताना कुपवाडमध्ये मात्र मुख्य रस्त्यासह अनेक ठिकाणी ऑनलाईन लॉटरीची दुकाने दिसतात. अन्य पोलिस ठाण्यांच्या तुलनेत या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे प्रमाण जास्त आहे. कुपवाड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कुपवाड गावठाण, बामनोळी, सावळी, अहिल्यानगर, यशवंतनगर या परिसराचा समावेश आहे.
गुन्हेगारी वाढली
पूर्वी संजयनगर या भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी होती. विश्रामबागच्या तत्कालीन पोलिस अधिकार्यांच्या धास्तीने गुन्हेगारांनी त्यांचा मोर्चा संजयनगरकडून अहिल्यानगरकडे वळविला. तत्कालीन पोलिस निरीक्षकांच्या कारवाईला घाबरून गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारी बंद केली. मात्र आता हमालवाडी, बजरंगनगर, कापसे प्लॉट, शंभरफुटी रोड, बामनोळी या परिसरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. बाहेरून राहण्यास आलेल्या लोकांच्या परिसरात ही गुन्हेगारी वाढली आहे. यापैकी अपवाद वगळता सर्व गुन्हेगार हे 16 ते 22 वयोगटातील असून त्यांचे आई, वडील एमआयडीसीत कामगार आहेत. यापैकी काहीजण गांजासारख्या नशेच्या आहारी गेले आहेत. कुपवाडमधील काही परिसरात गांजा कुठून उपलब्ध होतो, याचा तपास होणे आवश्यक आहे. कारण गांजाच्या सेवनामुळे तरुण पिढी गुन्हेगारीच्या मार्गावर जात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच समाजाचेही नुकसान होते. कुपवाड एमआयडीसी येथे देखील यापूर्वी पोलिसांनी ड्रग्जबद्दल कारवाई केली होती.
पोलिसांना माहिती गरजेची
जिल्ह्यातील सर्व घरमालकांनी त्यांच्या भाडोत्री व्यक्तींबाबत माहिती संबंधित पोलिस ठाण्याला कळविण्याचे आदेश तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी दिले होते. कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एमआयडीसीत काम करण्यासाठी अनेक ठेकेदारांनी कुपवाड येथे परप्रांतीय लोक कामासाठी आणले आहेत. परंतु त्यांच्याबाबतच्या सर्व नोंदी पोलिस ठाण्याला कळविण्यात आलेल्या नाहीत. आठ खून करणारे बहुसंख्य संशयित आरोपी हे भाडोत्री घरात राहतात. भविष्यात गुन्हेगारी कमी करण्यासाठी व तातडीने तपासासाठी भाडोत्री व्यक्तींची माहिती पोलिसांना असणे आवश्यक आहे. सध्या कुपवाड पोलिस ठाण्यामध्ये मंजूर संख्येपेक्षा कमी संख्येने पोलिस कार्यरत आहेत. तरीदेखील नियोजनबद्ध व कायद्याचा धाक राहील, अशी कार्यवाही करणे आवश्यक आहे.
...तशी जरब पुन्हा हवी
तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मेंढे स्वतः पेट्रोलिंग करायचे. त्यांच्यासोबत तीन-चार कर्मचारी असायचे. चौकात अथवा पान टपरीसमोर तीन किंवा जास्त लोक बोलताना थोडा वेळ दिसले तरी, गाडीतील ते कर्मचारी उतरून त्या उभ्या राहिलेल्या लोकांकडे जायचे. अगोदर त्या कर्मचार्यांच्या काठ्या बोलायच्या आणि नंतर विचारले जायचे, तुम्ही इथे का उभारला आहे. त्याचा परिणाम असा झाला की, टवाळखोर लोक, चौकात व पान टपरीसमोर उभे असलेले लोक पोलिस गाडी बघून सुसाट पळत सुटू लागायचे. तसा पुन्हा एकदा धाक कुपवाडमध्ये बसणे आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.