पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तलाठी पतीने पॅरालिसिस झालेल्या पत्नीला जबरी मारहाण केली आहे. या घटनेत पीडितेच्या गळ्याला गंभीर ओरखडे लागून ती जखमी झाली असून, मेव्हण्यालाही आरोपी पतीने मारहाण केली आहे. पत्नीच्या फिर्यादीवरून तलाठी पतीवर आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार स्वाती शंकर दिवेकर आपल्या पती शंकर आप्पासाहेब दिवेकर (रा. आंबेगाव बु., मूळ रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यासोबत दळवीनगर, आंबेगाव बुद्रुक येथे राहतात. आरोपी पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. जून महिन्यात आरोपी नवऱ्यानं बायकोला, मनिषा सकुंडे हिच्यासोबत संबंध ठेवत असल्याचे सांगितले."मला तिच्याशी लग्न करायचे आहे, तू मला घटस्फोट दे," असे सांगून त्याने पत्नीला शिवीगाळ करून वारंवार मारहाण केली होती. १७ ऑगस्ट २०२५ रोजी, दुपारी दोनच्या सुमारास आरोपी पतीनं आपल्या आईला फोन केला. तसेच पत्नीबाबत चर्चा केली. त्यावेळी पत्नी स्वाती यांनी "तुम्ही माझ्याबद्दल आईला काय सांगता आहात?" असा प्रश्न विचारला. याचा राग आल्याने शंकर दिवेकर यांनी पत्नीला लाथाबुक्क्यांनी आणि खुर्चीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर पत्नी स्वाती यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी शंकर दिवेकर याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352 व 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.