तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी उडतायेत. माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम (OPS) यांच्या नेतृत्वाखालील AIADMK कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ACRCC ने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोडल्याची अधिकृत घोषणा केली आहे. चेन्नईत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हं आहेत.
NDA सोडण्यामागचं नक्की कारण काय?
पन्नीरसेल्वम यांचे जवळचे सहकारी आणि ACRCC चे सल्लागार पनरुती एस. रामचंद्रन यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं की, NDA कडून पन्नीरसेल्वम यांची सातत्याने उपेक्षा केली जात होती. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलिकडील तामिळनाडू दौऱ्यात पन्नीरसेल्वम यांना भेटण्याची संधी नाकारण्यात आली. हे अपमानास्पद होतं. त्यामुळेच NDA सोडण्याचा निर्णय अपरिहार्य ठरला, असं रामचंद्रन यांनी स्पष्ट केलं.
पन्नीरसेल्वम यांचं मौन आणि स्टॅलिन यांची भेट
पन्नीरसेल्वम यांनी पत्रकार परिषदेत NDA बाबत थेट काही भाष्य केलं नाही. त्यांनी फक्त, "रामचंद्रन काय म्हणत आहेत, तेच ऐका," असं म्हणत संवाद टाळला. मात्र त्यांच्या अलिकडील मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबतच्या ‘योगायोगाने’ झालेल्या भेटीने चर्चांना आणखी उधाण दिलं आहे. पन्नीरसेल्वम म्हणाले की, "मी सकाळी फिरण्यासाठी थियोसोफिकल सोसायटीत जातो. तिथेच स्टॅलिन आले होते. ही फक्त एक अपघातानं झालेली भेट होती. पण राजकारणात ‘योगायोग’ क्वचितच असतो, असं मानलं जात असल्यामुळे यामागे काही वेगळीच रणनीती असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होतोय.पन्नीरसेल्वम AIADMK चे ज्येष्ठ नेते असून ते तीन वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिले आहेत. जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK मध्ये फूट पडली आणि OPS यांनी वेगळा गट तयार केला.2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी NDA सोबत आघाडी केली होती, मात्र आता त्यांनी या युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी पन्नीरसेल्वम यांच्या पुढील रणनीतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. मात्र त्यांचं राज्यव्यापी अभियान, शांतता आणि धोरणात्मक हालचालींवरून मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.