Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रतन टाटा यांच्या निधनानंतर 'हे' ताज हॉटेल विक्रीसाठी; 17,600 कोटींच्या व्यवहाराची शक्यता, हा सुलतान खरेदी करणार दशकांची परंपरा!

रतन टाटा यांच्या निधनानंतर 'हे' ताज हॉटेल विक्रीसाठी; 17,600 कोटींच्या व्यवहाराची शक्यता, हा सुलतान खरेदी करणार दशकांची परंपरा!
 

भारतीय उद्योगविश्वातील आघाडीचा समूह टाटा ग्रुप  आपल्या हॉटेल व्यवसायात मोठे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटाची ताज हॉटेल्स चेन अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील आलिशान 'द पियरे हॉटेल'  विकण्याचा विचार करत आहे. ही डील अंदाजे 2 अब्ज डॉलर्स (सुमारे 17,628 कोटी रुपये) इतकी असू शकते.

खरेदीदार म्हणून ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया  आणि सौदी व्यावसायिक एस्सम खशोगी यांची नावे समोर येत आहेत. जर हा व्यवहार पूर्ण झाला, तर ताज जवळपास 20 वर्षांनंतर या प्रतिष्ठित हॉटेलचे व्यवस्थापन सोडणार आहे. या व्यवहारानंतर अमेरिकेत ताजकडे केवळ एकच हॉटेल - ताज कॅम्पटन प्लेस (सॅन फ्रान्सिस्को) शिल्लक राहील.

ताज ग्रुपने या करारावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार 'द पियरे हॉटेल'चे संचालक मंडळ विक्रीसंदर्भात अंतिम टप्प्यातील चर्चेत आहे. हा करार पक्का झाल्यास हॉटेलचे व्यवस्थापन सुलतान हसनल बोल्किया यांच्या मालकीच्या आलिशान 'डॉर्चेस्टर कलेक्शन'कडे जाऊ शकते, तर एस्सम खशोगी हे या व्यवहारासाठी आर्थिक सहाय्य देणार आहेत.

ताजने 2005 मध्ये हॉटेल विकत घेतले होते
ताजने 2005 साली 'द पियरे हॉटेल' खरेदी केले होते आणि हे उत्तर अमेरिकेतील आपले सर्वात प्रतिष्ठित हॉटेल असल्याचे म्हटले होते. 2009 मध्ये सुमारे 100 मिलियन डॉलर्स खर्चून त्याचे नूतनीकरण करण्यात आले. हॉटेलमध्ये 189 खोल्या, रेस्टॉरंट आणि आलिशान अपार्टमेंट्स उपलब्ध आहेत.

अपार्टमेंटधारकही भागधारक

या हॉटेलमध्ये राहणारे अपार्टमेंटधारक देखील भागधारक आहेत. त्यात अमेरिकेचे कॉमर्स सेक्रेटरी व ट्रम्प प्रशासनातील महत्त्वाची व्यक्ती हावर्ड लुट्निक, जॉर्डनची राजकुमारी फिरयाल, फॅशन डिझायनर टोरी बर्च आणि डिज्नीचे माजी प्रमुख मायकेल आयझनर यांसारख्या नामांकित व्यक्तींचा समावेश आहे.

2025 मध्ये 82 कोटींचा तोटा
'द पियरे हॉटेल' आणि सॅन फ्रान्सिस्कोमधील ताज कॅम्पटन प्लेस हे दोन्ही युनायटेड ओव्हरसीज होल्डिंग्ज (UOH) अंतर्गत येतात, जी टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडची (IHCL) 100% उपकंपनी आहे. अहवालांनुसार, FY25 मध्ये IHCL ने UOH मध्ये 2,324 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती; पण याच काळात कंपनीला 82 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
IHCL चे अध्यक्ष काय म्हणाले?

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे (IHCL) अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी अलीकडेच सांगितले की, कंपनीची परदेशात विस्तार करण्याची आक्रमक योजना नाही. जुलै महिन्यातील AGM मध्ये त्यांनी स्पष्ट केले होते की, ''आम्ही प्रत्येक जागतिक बाजारपेठेत जाणार नाही; तर निवडक ठिकाणांवरच विस्तार करू.'' FY25 मध्ये IHCLच्या आंतरराष्ट्रीय हॉटेल्सने सुमारे 1,512 कोटी रुपयांचे उत्पन्न आणि 202 कोटी रुपयांचा कार्यकारी नफा नोंदवला होता.

रतन टाटा यांच्या निधनानंतर विक्रीची चर्चा
रतन टाटा यांच्या निधनाच्या (9 ऑक्टोबर 2024) एक वर्षाच्या आतच 'द पियरे हॉटेल' विक्रीच्या चर्चेत आले आहे. माध्यमांच्या अहवालांनुसार, रतन टाटा यांच्या जाण्यानंतर टाटा ग्रुपमध्ये अनेक घडामोडी झाल्या आहेत. आधी टीसीएसमध्ये नोकरकपात, नवीन भरतींवर बंदी आणि भोपाळसारख्या शहरांमधून व्यवसाय कमी करण्याच्या बातम्या आल्या. तसेच नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांच्यातील मतभेदही उघड झाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.