राज्य सरकार घेणार 'हे' 2 मोठे निर्णय! 5 वर्षांत थकबाकीदार नसलेलाच
यापुढे ग्रामपंचायत निवडणुकीस पात्र; ग्रामपंचायतीचा एकरकमी कर भरल्यास
मिळणार 50 टक्के माफी
ग्रामपंचायतींच्या कराची थकबाकी मोठी आहे, ती कमी करण्यासाठी शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये समृद्ध पंचायतराज अभियान काळात एकरकमी कर भरल्यास ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवाय मागील पाच वर्षांत थकबाकीदार नसलेल्या व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीस उभारता येणार आहे. याबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील सरपंच कार्यशाळेत ग्रामविकास मंत्री बोलत होते. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. गावातील प्रश्न गावातच सुटण्यासाठी ग्रामविकास काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यासाठी 'समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यात येत आहे. गावातील मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे थकीत कराचा. हा कर नियमितपणे शासनाच्या तिजोरीत जमा होण्यासाठी अभियान कालावधीत एकरकमी कर भरणाऱ्या व्यक्तीला ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे ग्रामविकासमंत्री गोरे म्हणाले.
घरकुलासाठी सर्व अटी, नियम शिथिल करू
कार्यशाळेत गायरान जमिनीवर घरकुलास परवानगी मिळत नसल्याची तक्रार चपळगावचे (ता. अक्कलकोट) सरपंच सिद्धाराम यांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घरकुलांसाठी सर्व अटी व नियम शिथिल केले आहेत. ९० दिवसात घरकुलांची कामे पूर्ण करायची असतील, तर या अडचणी प्राधान्याने सोडवल्या पाहिजेत. वेळ पडली तर नियम बदलू, कायदा बदलू; पण लोकांची कामे थांबली जाणार नाहीत, असे आश्वासन पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.