राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही' या जयंत पाटील यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना पडळकर यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली. मात्र, या टीकेदरम्यान त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या वक्तव्यांमध्ये नाभिक समाजाचा अपमान झाल्याचा मुद्दा समोर आला आहे.
जयंत पाटील यांच्या टीकेला पडळकरांचे सडेतोड उत्तर
जत विधानसभा मतदारसंघातील मतचोरीच्या आरोपावरून जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला होता. 'मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही' असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना पडळकर यांनी जयंत पाटलांना 'बिनडोक' म्हटले. "जर मतचोरी झालीच, तर 1990 पासून तुम्ही सलग मतचोरी करूनच निवडून येत आहात का?" असा सवाल पडळकरांनी केला. तसेच, दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन लढण्यासाठी हिंमत लागते आणि ती जयंत पाटलांकडे नाही, असे आव्हानही त्यांनी दिले.
'मी शिक्षकाचा मुलगा, तर ते चोराचे'
या वादाला आणखी धार देत गोपीचंद पडळकर म्हणाले, "मी एका शिक्षकाच्या पोटी जन्माला आलो आहे, आणि हा एका चोराच्या पोटी जन्माला आला आहे." जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना पडळकर पुढे म्हणाले की, पाटील हे लहान-सहान दरोडे टाकत नाहीत, तर त्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांवर दरोडे टाकले आहेत. "संभाजी पवार आप्पांचा कारखाना जयंत पाटलांनी ढापला," असा थेट आरोपही त्यांनी केला. जयंत पाटील हे 200 ते 500 कोटी रुपयांपेक्षा मोठा दरोडा टाकणारे दरोडेखोर आहेत, असेही पडळकर म्हणाले.
'दाढ्या केल्या का?' या विधानामुळे नवा वाद
पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका करताना त्यांच्या शिक्षणावरून आणि ज्ञानावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "न शिकलेल्या आमच्या मेंढपाळाला सुद्धा हे कळतं, मग याला कळत नाही का? हजामती करतो का? इतकंही कळत नाही, महाराष्ट्रात इतकी वर्षे दाढ्या केल्या का?" अशा शब्दांत त्यांनी जयंत पाटलांवर टीका केली. हे विधान म्हणजे नाभिक समाजाच्या कामाला कमी लेखण्यासारखे आहे. हे वाक्य नाभिक समाजाच्या कामाची खिल्ली उडवणारे आणि त्यांच्या श्रमाचा अपमान करणारे असल्याचा मुद्दा ठळक होत आहे. एका बाजूला पडळकर शिक्षण आणि ज्ञानाची गोष्ट करत असले, तरी त्यांच्या याच विधानामुळे त्यांच्यावर टीकेची शक्यता निर्माण झाली आहे.
पडळकरांचे जयंत पाटलांना आव्हान
गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना जाहीर आव्हान देत वसंतराव पाटील आणि राजाराम पाटील यांच्यातील तीन पिढ्यांचा वाद कशामुळे आहे, हे जाहीर करावे असे म्हटले आहे. त्यांनी जतमध्ये लक्ष घालू नये, असा इशाराही दिला. तसेच, 'कितीही पैसे वाटले तरी जनतेला माहिती आहे की विकास देवाभाऊंच्या नेतृत्वातच होणार आहे', असे सांगत त्यांनी जत मतदारसंघातील जनतेचा पाठिंबा आपल्यासोबत असल्याचे अधोरेखित केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.