नेपाळचे एकमेव अब्जाधीश आणि त्यांचा यशस्वी प्रवासनेपाळमधील एकमेव अब्जाधीश: विनोद चौधरी हे नेपाळमधील एकमेव अब्जाधीश उद्योगपती आहेत, ज्यांची संपत्ती 1.8 अब्ज डॉलर्स (सुमारे 16,700 कोटी रुपये) आहे. नेपाळसारख्या 3 कोटी लोकसंख्येच्या आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक देशात त्यांनी 'चौधरी ग्रुप'च्या माध्यमातून व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या यशामुळे ते नेपाळचे 'एलोन मस्क' म्हणून ओळखले जातात.
कौटुंबिक व्यवसायापासून वैश्विक विस्तार
काठमांडू येथील मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या विनोद यांचे आजोबा राजस्थानमधून नेपाळला स्थलांतरित झाले आणि कपड्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या वडिलांनी 'अरुण एम्पोरियम' नावाचे दुकान उघडले, जे विनोद यांनी नेपाळचे पहिले डिपार्टमेंटल स्टोअर बनवले. वडिलांच्या आजारपणामुळे वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडून व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली.
'वाई वाई' नूडल्सची लोकप्रियता
विनोद चौधरी यांना खरी प्रसिद्धी 'वाई वाई' इन्स्टंट नूडल्समुळे मिळाली, ज्याने मॅगीला भारत आणि नेपाळमध्ये तगडी टक्कर दिली. थायलंडच्या सहलीवर नूडल्सची लोकप्रियता पाहून त्यांनी 1980 च्या दशकात 'वाई वाई' लाँच केले. कमी किंमत, चव आणि जलद तयारीमुळे हे नूडल्स नेपाळ आणि भारतातील गल्लीबोळांपासून मॉल्सपर्यंत पोहोचले.
विविध क्षेत्रांमधील विस्तार
चौधरी यांनी 'सीजी कॉर्प ग्लोबल'च्या माध्यमातून नूडल्ससह बँकिंग, हॉटेल्स, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स, विमा आणि किरकोळ क्षेत्रात व्यवसाय वाढवला. 1990 मध्ये सिंगापूरमध्ये 'सिनोव्हेशन ग्रुप' स्थापन केला आणि 1995 मध्ये नबिल बँकेत हिस्सा खरेदी केला. त्यांनी टाटा ग्रुपच्या ताज हॉटेल्ससह करार करून 100 हून अधिक देशांमध्ये 143 हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स चालवले.
चौधरींचं सामाजिक योगदान काय?
विनोद चौधरी केवळ उद्योगपतीच नाहीत, तर समाजसेवा, पुस्तक लेखन आणि चित्रपट निर्मितीतही सक्रिय आहेत. नेपाली काँग्रेसचे खासदार म्हणून त्यांनी राजकीय योगदान दिले आहे. त्यांच्या यशामागे परिश्रम, चिकाटी आणि व्यवसायातील दूरदृष्टी आहे, ज्यामुळे त्यांनी नेपाळच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान दिले. मात्र, बाँसबारी छाला जुत्ता कारखान्याच्या जमीन प्रकरणात त्यांच्यावर तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.