सांगली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगली शहरासह परिसरात ७५ सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संयोजक, भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली. त्याबाबतच्या पत्रिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
त्याची सुरवात बुधवारी (ता. १७) सकाळी सांगली संस्थानच्या श्री गणपती मंदिरात अथर्वशीर्ष आवर्तनाने होणार आहे. शेकडो महिला मंदिर सभामंडपात १५७५ आवर्तने म्हणणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता विष्णूदास भावे नाट्यमंदिरात प्रख्यात गायक, संगीतकार सलील कुलकर्णी यांचा ‘धरोहर’ हा भाव-भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील महिनाभर सांगली, मिरज, कुपवाड शहर व परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील, त्यात कार्यकर्ते, नागरीक सारेच सहभागी होतील. समाजात नवे परिवर्तन घडविण्याचा आणि साक्षरता, सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याची श्री. पाटील यांनी सांगितले.त्यात युवक व महिलांसाठी ए.आय. प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा; हृदयरोग, मेंदूविकार, मेंदूवरील आघात याबाबत जागृती, फिजिओथेरपी शिबिर, केंद्र व राज्य शासनांच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील. सोबत मनपाच्या विविध प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान, एक पेड माँ के नाम, रक्तदान, आरोग्य शिबिर, नागरीक संवाद, दिव्यांग व प्रतिभावानांचा गौरव, व्होकल फॉर लोकल प्रदर्शन, पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तिकेचे वाटप, विकसीत भारत चित्रकला स्पर्धा, पंडीत दिनदयाळ उपाध्ये जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचा समावेश असेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.